अमळनेर:- शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी प्रशासन सज्ज असून विविध कामांचे आराखडे सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी आढावा बैठकीत दिले. विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी ते अमळनेर येथे आले होते.
शहरातील जी.एस.हायस्कूल येथील आयएमए हॉल येथे ६ रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.तालुक्यातील सरपंच,ग्रामसेवक तसेच रोजगरसेवक यांच्याकडून कामाचा आढावा घेण्यात आला.यावेळी व्यासपीठावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे,रोहयो विभागाच्या उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे,महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे जिल्हा समन्वयक,गटविकास अधिकारी एन.आर.पाटील,विस्तार अधिकारी, जि.प.चे पाणीपुरवठा व बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेने या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.शासनाच्या योजना राबविण्यासाठी विविध विभागांचे काम लवकरात लवकर होण्यासाठी तालुकास्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात आले.यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेऊन अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवीन ६ हजार घरांचे उद्दिष्ट प्राप्त होणार असून त्या अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर तालुक्यातील शिल्लक लाभार्थ्यांचे नोंदनिकरण करावे तसेच १५ व्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी ३१ मार्च च्या आत खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तहसीलदार यांना सोबत घेऊन तालुक्यातील शेती पाणंद रस्ते पूर्ण करण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या.
बैठकीला तालुक्यातील सरपंच,ग्रामसेवक,रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.