सभासद रघुनाथ मोरे यांनी सहाय्यक निबंधक, बँक व्यवस्थापकांना दिले निवेदन…
अमळनेर:- येथील दि.अर्बन सहकारी बँकेच्या संचालकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने पंचवार्षिक निवडणूक तातडीने घोषित करण्यात यावी. तसेच नियमानुसार प्रशासक बसवण्यात यावा, अशी मागणी बँकेचे सभासद रघुनाथ रामभाऊ मोरे यांनी सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक आणि बँकेच्या व्यवस्थापकांकडे केली आहे. यासंदर्भात मोरे यांनी निवेदनही दिले आहे.
सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक आणि बँकेच्या व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.अमळनेर को-ऑप अर्बन बँक लि.अमळनेर या बँकेची सन २०१६ – २०२१ या कालावधीसाठी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक दिनांक-०९ ऑक्टोबर २०१६ रोजी झाली होती. या निवडणुकीत निवडून आलेल्या संचालक मंडळाचा कार्यकाळ गेल्या वर्षी २०२१ मध्ये पूर्ण झालेला आहे. यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये व संस्थेच्या उपविधीप्रमाणे नवीन संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया तातडीने घोषित होणे आवश्यक होते. त्या अनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण- २०१४ नुसार लवकरात लवकर निवडणूक त्या काळात झाली पाहिजे होती. परंतु कोरोनामुळे ती लांबवणीवर पडली होती. परंतु आता केंद्र व राज्य शासनाने कोरोनाचे निर्बंध उठवले असल्याने मुदत पूर्ण झालेल्या राज्यातील अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. तसेच अनेक सहकारी संस्थाचे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले आहेत. त्यामुळे संचालक मंडळ निवडीसाठी तातडीने निवडणूक कार्यक्रम जाहीर करावी, अशी मागणी मोरे यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रति या राज्य सहकार आयुक्त निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य पुणे, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नाशिक विभाग, नाशिक, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांनी देण्यात आल्या आहेत.