
मंदिराचा जीर्णोद्धार आणि सुशोभिकरणाचा निर्णयाने सामंजस्याने प्रश्न सुटला…
अमळनेर : अतिक्रमण काढायला गेलेल्या हिंदू मुस्लिम बिल्डरांनी हनुमानाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून विकसित करण्याचा निर्णय घेतल्याने काही वेळातच जातीय तणाव निवळला.

प्रशांत निकम आणि हाजी रफिक शेख यांनी वर्णेश्वर मंदिर परिसरात गट न ४१५ सामूहिक जमीन घेतली. हा मंदिर परिसर असल्याने काही समाज कंटकांनी आधी हिंदू मुस्लिम दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही तरुणांनी उत्साहाच्या भरात त्या जागेत देवाची लहान मूर्ती बसवली. आपल्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे कळताच प्रशांत निकम , मनोहर निकम , हाजी रफिक शेख , महेंद्र पाटील ,चेतन साळुंखे ,शकील शेख ,नावेद मेम्बर ,भरत पाटील ,भटू पाटील हे जेसीबी घेऊन गेले. तत्पूर्वी निकम यांनी पोलीस निरीक्षक विकास देवरे याना घटना कथन केली. जागेचे मालक तेथे पोहचताच दुसऱ्या बाजूने जमाव जमला आणि मंदिर तोडायला इतर समाजाचे लोक आले असे वातावरण तयार करण्यात आले. पो नि विकास देवरे यांनी हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर याना पाठवून निकम याना भक्तांच्या भावना समजून घेण्यास सांगितले. प्रशांत निकम व हाजी रफीक शेख यांनी जमलेल्या तरुणांनाच असे सांगितले की अशी मूर्ती खाली ठेवण्यापेक्षा आम्ही याठिकाणी मंदिर बांधून पेव्हर ब्लॉक लावून सुशोभित करून देतो. हे सांगताच तरुणांना सुखद धक्का बसला. काहींचा मात्र अपेक्षा भंग झाला. जातीय तणाव होण्याऐवजी सामंजस्याने अपेक्षेपेक्षा भक्तांना अधिक मिळाले. आणि काही वेळात समजोत्याने प्रश्न मिटला. लगेच मनोहर निकम यांच्या हस्ते भूमीपूजनही करण्यात आले. यावेळी शिवाजीराव पाटील,सागर पाटील, दीपक पाटील , सुजित पाटील , भटू पाटील ,संदीप पाटील , सागर सोनवणे , बंटी पाटील ,पुनमचंद पारधी , मनोज पारधी , गोरख भोई , सनी अभंगे , बाळा पाटील ,राज दाभाडे यांचेही सहकार्य लाभले. प्रशांत निकम आणि रफिक शेख यांनी औदार्य दाखवल्याने मोठा अनर्थ टळून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
वरणेश्वर मंदिरासाठीही औदार्य
त्याचप्रमाणे प्रशांत निकम यांनी याठिकाणी ले आऊट जवळ असलेल्या वरणेश्वर महादेव मंदिराच्या समोर ११ हजार स्क्वेअर फूट खुला भूखंड घेऊन तो विकसित करून देण्याचा आणि वरणेश्वर मंदिराला ५ लाख रुपयांचे भव्य गेट बांधून देण्याचा निर्णय घेतल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रतिक्रिया…
प्रशांत निकम आणि हाजी रफीक शेख यांनी मोठ्या मनाने घेतलेली भूमिका दोन्ही समाजातील ऐक्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे. आणि समाजकंटक तोंडघशी पडले. तरुण भक्तांना देखील अपेक्षेपेक्षा अधिक मिळाले.-विकास देवरे,पोलीस निरीक्षक अमळनेर