
अमळनेर : भौतिक सुविधा नसल्याने , कर्मचारी व्यवस्थापनातील वाद मंजूर पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी हजर राहत असल्याकारणाने आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी ३० रोजी मिराई बहुउद्देशीय संस्था अमळनेर संचलित धरणगाव तालुक्यातील बिलखेडा येथील आश्रम शाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना जवळच्या शासकीय आश्रमशाळेत प्रवेश देण्याचेही आदेशात नमूद आहे.

१९ /१०/२०२३ रोजी यावल प्रकल्प अधिकारी यांनी भेट दिली असता व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना सुखसुविधा दिलेल्या नव्हत्या, विद्यार्थ्यांना वसतिगृह नव्हते , अंथरून पांघरून दिलेले नव्हते, यासह अनेक त्रुटी आढळून आल्याचे अहवालात म्हटले आहे. त्याचप्रमाणे संस्थेतील आठ कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापन विरोधात मानसिक त्रास होत असल्याची तक्रार केली होती त्या अनुषंगाने आयुक्तालयातील प्रकल्प अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली असता अधीक्षक आणि अधिक्षिका यांच्या व्यतिरिक्त कोणीच शाळेत आढळून आले नाही. प्रयोगशाळा नव्हती , बसण्याला जागा नव्हती ,स्वच्छता आढळून आली नाही. कर्मचारी आणि व्यवस्थापनातील वादामुळे गुणवत्ता आढळली नाही. त्यांनतर त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली होती. व्यवस्थापनच्या मानसिक त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्यांनी आत्महत्येची परवानगी मागितली होती. एकंदरीत सर्व बाबींचा विचार करता आदिवासी आयुक्त नाशिक यांनी अनुदानित आश्रमशाळा बिलखेडा या शाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली आहे. आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना नजीकच्या आश्रम शाळेत प्रवेश प्रवेश देण्याची कार्यवाही करावी असेही पत्रकात म्हटले आहे.