
राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात ७ रोजी आंदोलन
अमळनेर : जळगाव जिल्ह्यातील सीसीआय केंद्राची मुदत वाढवण्यात यावी आणि अमळनेर तालुक्यात सीसीआय केंद्र सुरू करण्यात यावे यासाठी राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात ७ रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकरी नेते प्रा सुभाष पाटील यांनी दिला आहे.

प्रा सुभाष पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , जळगाव जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले कापूस खरेदी केंद्र (सीसीआय) बंद करण्यात येत आहेत. हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे. जिल्ह्यातील ५० टक्के शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रतीचा कापूस शिल्लक आहे. खाजगी व्यापारी कापूस खरेदी करताना शेतकऱ्यांचे शोषण करतात. त्यामुळे खरेदी केंद्राची मुदत वाढवून शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा तसेच जळगाव जिल्ह्यात कापूस उत्पादक म्हणून अमळनेर तालुका अग्रगण्य आहे. वारंवार अधिकाऱ्यांकडे मागण्या करूनही अमळनेरला सीसीआय केंद्र चालू झालेले नाही. हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे म्हणून ७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात किसान काँग्रेस तर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.