
वेळेची बचत व तक्रारींचे निरसन जलद गतीने होणार…
अमळनेर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 100 दिवस सुशासन कार्यक्रम अंतर्गत अमळनेर नगरपरिषदेने पथदिवे तक्रार भ्रमणध्वनी क्रमांकाचे उद्घाटन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांचा लोकाभिमुख प्रशासन करण्याकडे नेहमीच कल असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत अभियंता कुणाल महाले व दिवाबत्ती विभागाने पथदिवे तक्रार भ्रमणध्वनी द्वारे करण्याची सुविधा अमळनेर शहरातील नागरिकांना उपलब्ध करून दिली असून लहानसहान गोष्टी करीता नागरिकांना होणारा त्रास कमी करणे असा ह्या सेवेमागचा उद्देश आहे. नागरिकांना पथदिवे बंद असल्याची तक्रार करण्यासाठी नगरपरिषदेत येण्याची आवश्यकता राहणार नसून भ्रमणध्वनी द्वारे तक्रार दाखल करण्याची सुलभ सुविधा उपलब्ध होणार आहे .नागरिक कार्यालयीन वेळेत (स 9.30 ते साय 6.30 पर्यंत) फोन द्वारे तक्रार दाखल करू शकणार असून त्याव्यतिरिक्त वेळेत एसएमएस व व्हाट्सएप या माध्यमाचा वापर करून तक्रार दाखल करता येईल. नागरिकांच्या वेळेची बचत होणार असून नागरिकांनी पथदिवे तक्रार 9226404011 या क्रमांकावर करावी असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
याप्रसंगी उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण , विद्युत अभियंता कुणाल महाले, प्रशासकीय अधिकारी महेश जोशी, रविंद्र लंबोळे, रवींद्र उदेवाल ,आबीद शेख यांच्या सह इतर अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

