
अमळनेर : तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानीबाबत पीक विमा आठ महिन्यांपासून का मिळाला नाही असा जाब लोकशाही दिनी जिल्हाधिकारीना विचारण्यात आला असून १५ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा न मिळाल्यास कोणत्याही क्षणी प्रांत कार्यालयासमोर पूर्वसूचना न देता शेतकरी आत्महत्या प्रात्यक्षिक फाशी आंदोलन करण्याचा गंभीर इशाराही देण्यात आला आहे.

जळगाव जिल्हाधिकारी तथा तक्रार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष याना अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ७ एप्रिल रोजी लोकशाही दिनी लेखी तक्रार केली की , खरीप हंगाम २०२४-२०२५ मधील शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी आगाऊ ऑनलाईन तक्रार आणि नुकसानीचे वेळेवर पंचनामे झाले असल्यावरही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने सात महिने उलटले तरी शेतकऱ्यांच्या नुकसानी चा पीक विमा (जोखीम) दिलेला नाही. जिल्हाधिकारी म्हणून आपण तक्रार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष नात्याने आदेशीत केले असते तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला असता असेही तक्रारीत म्हटले आहे.
खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७५ टक्के नुकसानीचे प्रति हेक्टर २८ हजार रुपये पीक विमा नुकसान भरपाई (जोखीम स्तर) १५ एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे सक्त आदेश ओरिएंटल इंस्युरांस कंपनीला देण्यात यावेत अन्यथा शेतकरी पूर्व सूचना न देता अमळनेर येथील प्रांत कार्यालयात शेतकरी आत्महत्या प्रात्यक्षिक (फाशी ) आंदोलन करतील व यास पीक विमा कंपनी ,शासन ,प्रशासन जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर दिलीप बाबुराव पाटील, मधुकर कौतिक पाटील , निंबा पंडित पाटील , जगदीश पाटील ,सुभाष पाटील ,पंढरीनाथ साळुंखे , गजानन साळुंखे ,उमेश सुर्वे , जिजाबराव बडगुजर , विमलबाई पाटील ,भास्कर पाटील , बापू महाले ,राजेंद्र खाटीक , देविदास पाटील ,भगवान पाटील , मनोहर पाटील,ज्ञानेश्वर पवार , गजानन पाटील , रवींद्र पाटील , राजेंद्र पाटील ,हेमलाल पाटील यांच्या सह्या आहेत.
गेल्या वर्षी देखील ओरिएंटल इंस्युरंस कंपनीने विमा देण्यास टाळाटाळ करून थेट दिल्ली पर्यंत अपील केले होते. मात्र विमा कंपनीचे खोटे दावे उघड केल्याने गेल्या वर्षी कंपनीला विमा देणे भाग पाडले होते.