
जागृत हनुमान मित्र मंडळाने राबवला स्तुत्य उपक्रम : परिविक्षाधीन डी वाय एस पी केदार बारबोले
अमळनेर : मुलांमध्ये क्षमता असेल आणि गावाने त्याचे कौतुक केले तर त्यांना अधिक ऊर्जा मिळते. जागृत हनुमान मित्र मंडळाने स्तुत्य उपक्रम राबवला आहे. खान्देशात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने ते वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अभ्यास केंद्रात लहान मुलांना सामावून घ्या विविध शालेय स्पर्धांपासूनच त्यांची स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू होते असे प्रतिपादन परिविक्षाधीन डी वाय एस पी केदार बारबोले यांनी तांबेपुरा येथे जागृत हनुमान मंदिरात केले.
जागृत हनुमान मित्रमंडळातर्फे हनुमान जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, स्पर्धा परीक्षा पुस्तक वाटप आणि गुणवंतांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. रक्तदान शिबिराचे उदघाटन केदार बारबोले व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून प्रल्हाद भावसार ,संजय पाटील , विजय राजपूत हजर होते. यावेळी डीवायएसपी विनायक कोते यांनी देखील भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. पोनि दत्तात्रय निकम ,प्रवीण पाटील ,गिरीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रदीप पाटील , निखिल गुरव , संदीप पाटील , कोमल पाटील , दिव्या केने , तेजस पाटील , निलेश वाघ , सागर पाटील यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाटण्यात आली. तर विविध क्षेत्रात प्राविण्य मिळणाऱ्या तेजस पाटील ,हरीश पाटील , प्रतीक पाटील, आस्मा पिंजारी ,गीतांजली पाटील , तनुजा गुजर , घनिष्क गिरीश पाटील , निखिल गुरव यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. एकूण ४० जणांनी रक्तदान केले. १०० जणांची रक्तगट तपासणी करण्यात आली. प्रास्ताविक सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी तर आभार संजय पाटील यांनी मानले.
हनुमान जयंतीनिमित्त तांबेपुरा ,न्यू प्लॉट सानेनगर भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीतील हनुमानाची भव्य प्रतिमा आकर्षण ठरली होती. १२ रोजी रात्री हभप रविकिरण महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.