
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन ,एकावर गुन्हा दाखल
अमळनेर : सात्री येथील गिरणा पाटचारी वर अतिक्रमण काढण्याचे आदेश असतांनाही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून गिरणा पाटबंधारे विभागाच्या जागी जेसीबी मशीनने चारी खोदणाऱ्यावर जलसंपदा विभागाने गुन्हा दाखल करून जेसीबी मशीन जप्त केले आहे.
अमळनेर तालुक्यातील सात्री येथे येण्याजाण्याला रस्ताच नाही. व गाव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात असल्याने पुनर्वसन देखील अपूर्ण अवस्थेत आहे. गावाला रस्ता नसल्याने चार ते पाच जणांचा मृत्यू झाला असून नुकतीच आग लागली तेव्हा अग्निशमन दलाची गाडी नदी पात्रात अडकली होती. त्यामुळे रस्त्याची अत्यंत आवश्यकता आहे. या गावाला पूर्वीच्या गिरणा पाटबंधारे विभागाच्या पाटचारीच्या जागेतून रस्ता देण्यात यावा असा निर्णय प्रशासनाने घेतला होता. गिरणा पाटचारी बंद असून हा विभाग निम्न तापी प्रकल्प पाडळसरेकडे वर्ग झाला आहे. आणि पाटचारीला पाणी नाही. मात्र काही शेतकऱ्यांनी गिरणा पाटचारीच्या वेळी मोबदला घेऊनही या जागेवर अतिक्रमण केले आहे. रस्त्याला विरोध करत शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाला पाटचारी सुरू असल्याचे दर्शवले होते. ही बाब उच्च न्यायालयात उघड झाल्यावर न्यायालयाने अतिक्रमण काढण्यास मुभा दिली होती. अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्याला विरोध केला आहे. याबाबत नुकतीच उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी दोन्ही गटाची व अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सामंजस्याने रस्ता द्या अन्यथा प्रशासन कठोर भूमिका घेईल अशा सक्त सूचना दिल्या होत्या. यावेळी दोन्ही गटांनी संमती दर्शवून होकार दिल्याने बुधवारी प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याची आखणी देखील करण्यात येणार होती. १३० फुटाचे अतिक्रमण काढण्याऐवजी शेतकऱ्यांनी ४० फूट रुंदीचा रस्ता मोकळा करण्याची सवलत देखील प्रशासनाने दिली होती.
परंतु १३ रोजी दुपारी एक वाजता गिरणा पाटबंधारे पाटचारीच्या जागी (सात्रीच्या नियोजित रस्त्याच्या जागी) जेसीबी मशीनने चारी खोदकाम सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांना मिळताच त्यांनी निम्न तापी प्रकल्प पाडळसरेचे कार्यकारी अभियंता मुकुंद चौधरी यांना कळवुन संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मुकुंद चौधरी यांनी उपकार्यकारी अधिकारी जितेंद्र याज्ञीक यांना पोलीस घेऊन घटनास्थळी जायला सांगितले. तेव्हा पावणे तीन वाजेच्या सुमारास जेसीबी मशीनच्या साहाय्याने गिरणा पाटबंधारे च्या जागेवर चारी खोदकाम सुरू होते. जेसीबी चालकाने मनोहर उत्तमराव पाटील (रा सात्री) यांच्या सांगण्यावरून ही चारी खोदल्याचे सांगितले. चालकाने आपले व मालकाचे नाव सांगितले नाही. जितेंद्र याज्ञीक यांनी काम थांबवून जेसीबी मशीन मारवड पोलीस स्टेशनला जमा केले. उच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक २५३५ मधील आदेशाचे उल्लंघन केले म्हणून मनोहर उत्तमराव पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २२३,२२४ ,३२६(ई) प्रमाणे शासकीय कामात अडथळा आणणे , अतिक्रमण करणे , शासकीय जागेवर कपटीपणाने कब्जा करणे या भारतीय न्याय संहिता २२३,२२४ ,३२६(ई) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.
अतिक्रमण धारकांनी याठिकाणी चारी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. जेसीबी विरुद्ध महसुलच्या गौण खनिज नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.