
पाठोपाठ आग लागल्याने कसब पणाला लावत कर्मचाऱ्यांनी आगीवर मिळवले नियंत्रण…
अमळनेर : अग्निशमन दिनी तालुक्यात पाच ठिकाणी एका पाठोपाठ आग लागल्याने कर्मचाऱ्यांच्या कसब पणाला लागले होते. शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाने वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळले आहेत.
तालुक्यातील धार रस्त्यावरील भटू भिका पाटील यांच्या शेतात १४ रोजी दुपारी १ वाजता आग लागली. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना माहिती मिळताच त्यांनी अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी यांना ताबडतोब बंब पाठवण्याचे आदेश दिले. अग्निशमन दलाचा बंब पोहचताच चारही बाजूने आग नियंत्रणात आणून गहू वाचवण्यात यश मिळवले. ही आग विझवली जात नाही तोच शहरातील केशवनगर भागात आग लागली. पालिकेचा दुसरा बंब पाठवण्यात आला. केशवनगर मध्ये झाडाना आग लागली होती. लागूनच घरे होती आणि हवेमुळे आग पसरण्याची शक्यता होती. दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवली. तेथून परत येत नाही तोपर्यंत पावणे तीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील दहिवद येथे विलास बिरारी यांच्या शेतात आग लागली. गाड्या भरून धावपळ करत अग्निशमन दल पोहचले आणि वेळीच आग आटोक्यात आणून शेतकऱ्याचा मका वाचवला. ही आग विझवली जात नाही तोपर्यंत तालुक्यातील रणाईचे येथे शेतात आग लागल्याने खळ्यातील झाडे, चारा आदी साहित्य जळाले. रात्री कुऱ्हे खुर्द येथे जांभळाच्या झाडाला आग लागली. जवळच झोपडपट्टी असल्याने वस्तीला धोका होता. गटविकास अधिकारी एन आर पाटील यांनी माहिती देताच तातडीने अग्निशमन दलाला रवाना करण्यात आले.

अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी, दिनेश बिऱ्हाडे , फारुख शेख, जाफर पठाण, आनन्दा झिम्बल ,मच्छीन्द्र चौधरी ,आकाश बाविस्कर, मुन्ना कंखरे यांनी पाचही ठिकाणी आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.
दरम्यान अमळनेर नगरपरिषद अग्निशमन विभागात राष्ट्रीय अग्निशमन दिवस व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरा करण्यात आले अमळनेर नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर उपमुख्य अधिकारी रवींद्र चव्हाण ,अग्निशमन प्रमुख गणेश गोसावी , डिगंबर वाघ , आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे ,महेश जोशी ,सोमचंद संदनशिव , रवींद्र लांबोळे , दिनेश बिऱ्हाडे व सर्व अग्निशमन कर्मचारी हजर होते.