अमळनेर:- शहरातील सानेनगर भागात बोरी नदीवर पूल बांधावा अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा सानेनगर वासीयांनी दिला आहे.
सानेनगर भागात बोरी नदीत नंदगाव, अंतुर्ली रंजाणेच्या बंधाऱ्याचे बॅक वॉटर साचलेले असते. या भागातील शेतकऱ्यांची शेती पूर्वेस नदी पलीकडे असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचणी येतात. शेतकरी नदीतूनच बैलगाडी नेण्याचा प्रयत्न करतात. गेल्या वर्षी एक बैलगाडी वाहून चालली होती. काठावरील ग्रामस्थांच्या सतर्कतेने बैल व शेतकऱ्यांना वाचवण्यात आले होते. अन्यथा शेतकऱ्यांना पाच ते सहा किमीचा फेरा करून शेतात जावे लागते. म्हणून शेतकऱ्यांनी सानेनगर भागात बोरी नदीवर पुलाची मागणी केली होती. अनिल पाटील यांनी पूल करण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर असमाधानकारक उत्तर दिल्याने सानेनगर नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष सचिन पाटील, रावसाहेब पहिलवान, दिपक पवार, रामकृष्ण पाटील,निलेश पाटील, संदीप पाटील, राज बिऱ्हाडे, शशीकांत पारधी, भुरा पाटील, महेश पाटील,बापू पाटील, संतोष पाटील,मयूर पाटील, काशीनाथ पाटील आदी उपस्थित होते.