
मध्यप्रदेशातील चोरट्यांच्या अमळनेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
अमळनेर-चोरीची असलेली मालवाहतूक पिकअप गाडी अमळनेरात आणून विक्रीचा घाट रचणाऱ्या मध्यप्रदेशातील चोरट्यांच्या अमळनेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
दिनांक 16 एप्रिल रोजी अमळनेर पोलीस ठाण्यातील डीबी पथकास पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहिती मिळाली की, एक मालवाहतुक करणारी पिकअप चोरीची असून ती अमळनेर शहरात विक्रीसाठी येत आहे. सदर बाबत अंमळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी केदार बारबोले व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे माऊली टी हाऊस गलवाडे रोड येथे नाकाबंदी लावण्यात आली. नाकाबंदी दरम्यान 8 वाजेच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची पिकअप मालवाहतूक गाडी गलवाडे रोड कडून आली. तिला नाकाबंदी ठिकाणी थांबवण्यात आले असता तिच्यावर पुढील बाजूस MH 18 G 3221 अशी नंबर प्लेट चिटकवलेली होती. सदर पिकअप मध्ये फिरोज खान अमित खान (वय 29 वर्ष राहणार आगार रोड उज्जैन मध्य प्रदेश) आणि दानिश शेख अब्दुल शकूर शेख (वय 23 वर्ष राहणार साजापूर मोहल्ला मोगलपुरा मशिद जवळ तालुका जिल्हा साजापूर मध्य प्रदेश) हे दोन संशयित बसले होते.त्यांना सदर वाहनाचे कागदपत्र व मालक कोण असल्याबाबत विचारपूस केली असतात ते पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले. त्यावरून संशय आल्याने सदर वाहन जप्ती व पंचनामा करून पोलीस स्टेशनला आणण्यात आले. वाहनाचे बारकाईने निरीक्षण करता. चिटकवलेल्या नंबर प्लेटच्या खाली आणखी एक नंबर प्लेट होती तिच्यावर MP 43 G 2132 असा क्रमांक होता. त्यावरून वाहनाचा मूळ मालकास संपर्क करून विचारपूस केले असता सदर वाहन हे रतलाम मध्य प्रदेश येथील असल्याचे समजले आहे. सदर वाहन हे दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी रात्री बस स्टॅन्ड च्या पाठीमागील भागातून चोरीस गेल्याचे वाहन मालक यांनी सांगितले. सदर बाबत स्टेशन रोड पोलीस स्टेशन रतलाम मध्य प्रदेश येथे गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. संशयित इसम हे सराईत असून त्यांची ओळख साजापूर कारागृहात झालेली आहे.
दरम्यान काल दिनांक 17 रोजी रतलाम चे पोलीस अधिकारी व तपासी अंमलदार यांचे पथक अमळनेर पोलीस स्टेशनला येऊन दाखल झाल्यानंतर सदर वाहन व संशयित इसम यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.