
४ किलो गांजासह १ लाख ३५ हजार २४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त
अमळनेर : तालुक्यातील कामतवाडी येथून जळगावला गांजा विक्रीसाठी नेणाऱ्या धरणगाव तालुक्यातील दोघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळील ९० हजार २४६ रुपये किमतीचा ४ किलो ५४६ ग्राम गांजा आणि ४५ हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण १ लाख ३५ हजार २४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२८ रोजी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली की, कामतवाडी गावाहून मोटरसायकल क्रमांक एम एच १९ , डी आर ९७९१ वर जळगावला गांजा विक्रीसाठी नेण्यात येत आहे. त्यानुसार पो नि निकम यांनी डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव, राहुल पाटील , जितेंद्र निकुंभे ,अमोल पाटील ,उदय बोरसे , समाधान सोनवणे, सुनील पाटील यांना घेऊन कामतवाडी येथे तोरणामाता मंदिराजवळ सापळा रचला. वरील मोटरसायकलवर दोन इसम आले असता पोलिसांनी त्यांना अडवून त्यांची विचारपूस केली असता त्यांच्याजवळ गोणीत ४ किलो ५४६ ग्राम गांजा आढळून आला. पोलिसांनी त्यांना त्यांची नावे विचारली असता राकेश गुलाब पाटील वय २७ व मागे बसलेला कारण गजानन भिल (वय २१ रा वागळुद ता धरणगाव) असे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याजवळील गांजा व मोटरसायकल दोन्ही जप्त करून दोघांविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८ (क) , २०( ब)( २)( क) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
तर रेल्वे स्टेशनच्या गेट च्या आडोश्याला टपरीच्या बाजूला काही इसमाकडून गांजा ओढला जात असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव , प्रशांत पाटील , मिलिंद सोनार , निलेश मोरे , विनोद संदानशिव यांनी २८ रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास छापा टाकला असता शुभम आनंदा पाटील (वय २८ रा बंगाली फाईल) याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम ८ (क ) २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.

