
अमळनेर : पोलिसांच्या सतर्कतेने रिक्षामध्ये विसरलेली पर्स सहित दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने मुंबईच्या महिलेला परत मिळाले आहेत.
मीना प्रमोद सोनवणे (वय ५२ रा गोरेगाव मुंबई) ही महिला आपल्या मुली व नातेवाईकांसह खान्देश एक्स्प्रेसने अमळनेर येथे आल्यानन्तर सामान जास्त असल्याने एका रिक्षात सर्व सामान आणि दुसऱ्या रिक्षात प्रवासी बसून ते सर्व जण डॉ अंजली चव्हाण यांच्या दवाखाण्याजवळ उतरले. नन्तर दुसऱ्या रिक्षाने वावडे येथे जात असताना ढेकू गावाजवळ महिलेची पर्स कुठे तरी हरवल्याचे समजले. महिलेने पोलीस स्टेशनला परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांना घटना सांगितली. महिलेला नेमक्या कोणत्या रिक्षात बसल्याचे सांगता येत नव्हते. बारबोले यांनी तातडीने डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , निलेश मोरे , विनोद संदानशीव याना सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यासाठी पाठवले. ही महिला मिलचाळ येथील प्रभाकर सुखदेव साळी यांच्या रिक्षात एम एच १९ बी झेड ५०९१ मध्ये बसल्याचे दिसून आले. पोलिसांनी तात्काळ रिक्षा शोधून विचारपुस केली असता ती पर्स रिक्षाच्या मागील बाजूस असल्याचे रिक्षा चालकाने संगितले. त्या पर्समधील गळ्यातील सोन्याची पोत , कानातील रिंग असे दोन तोळ्यांचे सोने महिलेला परत करण्यात आले. रिक्षाचालकाने देखील प्रामाणिकपणे पर्स शोधून असल्याची कबुली दिली म्हणून डीवायएसपी केदार बारबोले यांनी रिक्षाचालक प्रभाकर साळी याचा सत्कार केला.

