
दुकानांच्या बेशिस्त पार्किंग थेट रस्त्यावर केल्याने नागरिक वेठीस….
अमळनेर – सध्या सणासुदीचे दिवस असताना शहरात भाजीबाजारांसह बाजारपेठ असलेल्या ठिकाणी रस्त्यांना वाहनतळाचे स्वरूप येत असून सर्वत्र बेशिस्तपणे वाहने उभी केलेली दिसून येतात. यामुळे अनेक ठिकाणी दहा ते बारा मीटरचे रस्ते अवघे पाच ते सहा मीटर इतके अरुंद होत असल्याने अन्य वाहनचालकांना मार्गच राहत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. तरी देखील पोलीस व नगरपरिषद प्रशासनाकडून वाटेल त्या ठिकाणी दुचाकी, चारचाकी पार्क करणाऱ्या वाहनांवर व चालकांवर कुठल्याही प्रकारचा वचक राहिला नसल्याने शहरातील मुख्य बाजारातील चौका-चौकात वाहतूक कोंडी होत असल्याचा नागरिकांचे स्पष्ट आरोप आहे. सध्या सणासुदीचे दिवस सुरू असल्याने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदी करण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनांनी शहरात येतात मात्र या वाहनधारकांना दुकानदारांकडून देखील पार्किंगची व्यवस्था करण्यात आली नसल्याने वाहने दुकानांसमोर मुख्य रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे रोजच किरकोळ अपघात व नागरिकात वाद होऊन वाहतुकीचा फज्जा उडतो.
शहरातील मुख्य बाजारपेठेतील खाजगी व्यावसायिक संकुलात सोने- चांदी, कापड, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, यासह रोजचा लाखो-करोडोचा व्यवसाय करणारे व्यावसायिक मंडळी शहरात आहेत. मात्र त्यांनी मोठमोठी शोरूमस, दुकाने बांधली, उघडली खरी परंतु दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे पर्यायाने नागरिक आपली वाहने मुख्य रस्त्यावर उभी करतात.त्यामुळे मुख्य बाजारपेठेत नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. वाहतुकीची कोंडी थांबवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नगरपरिषद प्रशासनाचे सहकार्य घेऊन मुख्य बाजारपेठेतील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी उपाययोजना कराव्यात.अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया
सध्या सणासुदीचे दिवस सुरू असल्यामुळे बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ वाढल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते आहे हे खरं आहे. दोन दिवसात आखाजी झाली की, थोडी नागरिकांची वर्दळ कमी होईल.राहिला विषय दुकानासमोर वाहने पार्किंगचा तर संबंधित दुकानदाराला एक सिक्युरिटी ठेवण्याच्या सूचना देऊन तसेच मोठ्या दुकानदारांना आपापल्या ग्राहकांची वाहने रोडवर उभी न करण्याच्या देखील तोंडी सूचना देऊ.
राधेश्याम अग्रवाल, अतिक्रमण विभाग प्रमुख, नगरपरिषद,अमळनेर
प्रतिक्रिया
शहरातील मुख्य बाजारपेठेत व्यावसायिक संकुलनात वाहनतळाचे नियोजनच नसल्याने मुख्य रस्त्यावर बेशिस्त पार्किंग होत असते. वाहतूक पोलिसांकडून शहरात ‘फिक्स पॉईंट’ वरच कारवाई होत असते. अन्यत्र मात्र साफ दुर्लक्ष होत असल्याने नेहमी वर्दळ असलेल्या भागात कायम वाहतुकीची कोंडी होत असल्याचे शहरात सर्वत्र दिसून येते.
देवेंद्र सुनील पाटील,नागरिक, मुडी-दरेगाव

