
मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरील सवलत दिलेली अतिक्रमणे कधी काढणार ?
अमळनेर : शहरातील मुख्य रस्त्याला अडथळा ठरणारी झामी चौकातील २६ अतिक्रमणे पालिकेने २२ रोजी हटवली. त्यात १० पक्की घरे आणि १६ दुकाने यांचा समावेश आहे.
मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अतिक्रमणामुळे अडथळा निर्माण होत होता. रस्त्यांची कामे करताना देखील अडचणी येत होत्या. म्हणून नगरपरिषदेने अतिक्रमण न्यायिक कठोर भूमिका घेतली. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या आदेशाने बांधकाम विभाग अभियंता डिगंबर वाघ , अभियंता सुनील पाटील , शिमाली आंबोरे , अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल व त्यांच्या पथकाच्या मदतीने दोन जेसीबी मशीन लावून २२ रोजी सकाळी १० वाजता अतिक्रमित घरे पाडायला सुरुवात झाली. अमळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान गांधीनगर पाठोपाठ झामी चौकातील रस्त्यांना अडथळे ठरणारी अतिक्रमणे पालिकेने काढल्याने सर्वसामान्य जनतेने आनंद व्यक्त केला आहे. वाहतुकीची कोंडी सुटल्याने नागरिकांच्या सुरक्षेत वाढ होणार आहे. मात्र मुख्य बाजारपेठेत १२३ भूखंडातील अतिक्रमणे काढली तेव्हा काही दुकानदारांना रस्त्यावर अतिक्रमण असताना देखील थोडी जागा देऊन सवलत देण्यात आली होती. गोर गरीब , मध्यमवर्गीयांची अतिक्रमणे काढली गेली धनदांडग्यांची का काढली नाहीत? ठराविक लोकांना सहकार्य का ? असा सवाल नागरिक करत आहेत. भाजी बाजारात जातांना पायी चालणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे या भागातील अतिक्रमणे काढणे अत्यावश्यक आहे. अतिक्रमणामुळे महिला तरुणींना धक्काबुक्की होते. त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता १२३ मधील उर्वरित अतिक्रमण देखील काढण्यात यावे अशी मागणी होत आहे.