
वादंगावर पत्रकार परिषदेत गीतांजली घोरपडे यांनी दिली माहिती…
अमळनेर:- स्वातंत्र्य लढ्याचे स्मरण व्हावे , डॉ उत्तमराव पाटील व लीलाताई यांचे विचार समाजाला कळावेत म्हणून अमळनेर ते डांगरी पदयात्रा आयोजित केली होती. मात्र स्मारक खुले करण्यावरून काहींनी वादंग निर्माण केले त्यात थोर पुरुषांचा अवमान होऊ नये व डांगरी वासीयांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन २६ रोजी होणारी पदयात्रा लोकार्पण होईपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याची माहिती गीतांजली घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ उत्तमराव पाटील व लीलाताई यांचे स्मारक खुले करण्यावरून अमळनेरात सुप्त संघर्ष सुरू झाला. काही काँग्रेस नेत्यांनी कुलूप तोडून अपूर्ण स्मारकाचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न केला. त्यावर वाद होऊन आरोप प्रत्यारोप रंगले. आता काही नगरसेवकानी पालिकेला निवेदन देऊन तात्काळ लोकार्पण करावे अशी मागणी केली. मात्र या संघर्षाचे पडसाद पदयात्रेवर उमटले. लोकार्पण वादात असताना पदयात्रा काढणे योग्य नाही अशी भूमिका घेत लीलाताई व उत्तमराव पाटील यांचे पुतणे प्रशांत पाटील यांनी पदयात्रा स्थगित करण्याची विनंती पत्रकार परिषदेतच केली. यावेळी दीपक शिसोदे यांनी देखील संदीप घोरपडे यांची पदयात्रा क्रांतीकारकांच्या सन्मानार्थ आहेच मात्र किरकोळ प्रकारावरून गालबोट लागल्याने आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे , पदयात्रेचे आम्ही जोरदार स्वागत करू मात्र तूर्त यात्रा स्थगित करण्याची मागणी केली. पदयात्रेला विरोध केल्यामुळे या पदयात्रेला स्थगिती देऊन नंतर पदयात्रा काढली जाईल, असे घोरपडे यांनी सांगितले.
लोकार्पण फसल्यानंतर पदयात्रा स्थगित करण्याची आली नामुष्की…
शहरातील क्रांतीपर्व स्मारकाचे अपूर्ण असतानाच काँग्रेसचे काही पदाधिकारी यांनी लोकार्पण करण्याचा प्रयत्न केला. अपूर्ण स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करणे गरजेचे असताना कुलूप तोडून अपूर्ण स्मारकाचे लोकार्पण करण्याचा नसता उपद्व्याप केल्याने या प्रकाराला मोठा विरोध झाला. त्यातच डॉ. उत्तमराव पाटील यांच्या कुटुंबियांना व ग्रामस्थांना विश्वासात न घेता अमळनेर ते डांगरी पदयात्रा काढत असल्याचे जाहीर केल्याने कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी ह्याही कार्यक्रमाला विरोध केला. त्यानंतर पदयात्रा निघणारच असे म्हणणाऱ्या नेत्यांवरच पदयात्रा स्थगित करण्याबाबत पत्रकार परिषद घेण्याची नामुष्की आली आहे.