
अमळनेर:- तालुक्यातील झाडी ग्रामपंचायतीत गैरकारभार झाल्याचा आरोप करत सरपंच,ग्रामसेवकांच्या व सत्ताधारी सदस्यांच्या मनमानी विरुद्ध काही सदस्य व ग्रामस्थ 26 जानेवारी 2023 रोजी उपोषणाला बसले होते.नियमित मासिक सभा न होणे, ग्रामसभा न घेणे,आर्थिक व्यवहारात अफरातफर करणे, बनावट दस्तऐवज निर्माण करणे, शासनाची फसवणूक करणे, संशयित अपहार, ग्रामसेवकांची अनुपस्थिती, गावाला पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसणे, स्वच्छतागृहे मुताऱ्यांची अस्वच्छता, गटारी दोन वर्षापासून तुंबलेल्या अवस्थेत अशा अनेक समस्यांना कंटाळून उपोषणे, निवेदने, तक्रारी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी वरिष्ठ प्रशासन म्हणून पंचायत समिती व जिल्हा परिषदेला वारंवार केल्या परंतु जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या प्रशासनाला एक साधी चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची तसदी देखील घ्यावीशी वाटली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सुकलाल मालचे येथे ग्रामसेवक असून त्यांच्याकडे अतिरिक्त कारभार आहे.त्यांच्याकडून तो अतिरिक्त प्रभार काढून त्यांच्या जागी नवीन ग्रामसेवक देण्यात यावा अशी वारंवार मागणी करण्यात आली. तरीही त्यात लक्ष दिले नाही. सुशांत पाटील, किशोर शिंदे, अर्पित चव्हाण आणि आताचे एन आर पाटील तसेच दरम्यान अजून दोन अधिकारी येऊन गेले पण या अधिकाऱ्यांनी कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही. दाद मागून कंटाळून त्याचा निषेध म्हणून ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी बीडिओ एन आर पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ व प्रशासनाचे विद्यमान ग्रामसेवकांची प्रतिमा भेट देत गांधीगिरी सत्कार करून निषेध नोंदविला. आता तरी प्रशासनाला जाग येईल आणि आमच्या गावाला चांगला नियमितपणे येणारा पारदर्शी ग्रामसेवक मिळेल व आजपर्यंतच्या सर्व तक्रारीवर कार्यवाही होईल ही अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य निंबा लोटन पाटील,माजी सदस्य दिनेश सुभाष पाटील,दरबारसिंग पाटील, व्यंकट पाटील, जगदीश पाटील इ. उपस्थित होते.

