
अमळनेर :- जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन 2022 -23, सन 2023-24 या वर्षातील पीक कर्जाची मुदतीत वसुली करून दोन वर्षांनी शेतकऱ्यांकडून व्याज वसुली केली जात आहे. शासनाच्या आदेशानुसार दरवर्षी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले जाते. मात्र तेच पीक कर्ज मार्च अखेर नियमित परत फेड केल्यास त्यावर कुठलेही व्याजदर आकारले जात नाही. यामुळे शेतकरी बांधवाना बिनव्याजी पैसे मिळत असल्याने दरवर्षी मुदतीत पीक कर्ज परत फेड केले जात असताना यावर्षी सन 2024 – 25 पीक कर्जाची वसुली करून घेऊन ऐन नवीन पीक कर्ज घ्यायची वेळ आली असताना मागील दोन वर्षांची पीक कर्जावरील व्याज दराचा फतवा जळगाव जिल्हा बँकेने काढून शेतकऱ्यांकडून वसुली केली जात आहे.

यावर्षी सुरुवातीला जळगाव जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्यासाठी आवाहन करून सुरुवातीला पीक कर्ज वसूल करीत आता नवीन पीक कर्ज घेण्याची वेळ आली असताना मागील दोन वर्षाचे आकारलेले व्याज भराल तेव्हाच नवीन पीक कर्ज मिळेल अशी कोंडी केल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस जास्तीचा असल्याने उत्पन्न हवे तसें आले नाही. विना व्याज दराने मिळालेलं पीक कर्ज शेतकऱ्यांनी इकडून तिकडून पैसे जमवत भरलेही मात्र आता नवीन पीक कर्जासाठी बँकेत शेतकऱ्यांना मागचे दोन वर्षाचे थकीत व्याज भरा तरच पुढील पीक कर्ज मिळेल असा फतवा जळगाव जिल्हा बँकेने काढल्याने दोन वर्षापूर्वीचे विना व्याजी मिळालेले पीक कर्ज आता व्याजदर वसुली करून शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचे म्हटले जात आहे. तेही नियमित पीक कर्ज वसुली करून खरीप हंगाम 2025-26 चे पीक कर्ज वाटप करताना जळगाव जिल्हा बँकेच्या आडमुठे धोरणामुळे शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
कळमसरे येथील जिल्हा बँकेच्या शाखेत कळमसरे विकास सोसायटी, वासरे विकास सोसायटी, खर्दे विकास सोसायटी, पाडळसरे विकास सोसायटी, नीम विकास सोसायटी, शहापूर विकास सोसायटी, तांदळी विकास सोसायटी येथील शेतकरी नवीन पीक कर्ज घेण्यासाठी आले असताना मागील सन 2022 – 23, सन 2023 – 24 यावर्षात घेतलेल्या पीक कर्जाचे व्याज भरा मगच यावर्षीचे पीक कर्ज मिळेल असे सांगण्यात आल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
कळमसरे जळगाव जिल्हा बँकेच्या शाखेत सन 2022-23 या वर्षात 566 सभासद तर 2023 – 24 या वर्षात 788 सभासदांकडून व्याज वसुली केली जात आहे. हीच परिस्थिती तालुक्यातील प्रत्येक गावातील विकास सोसायटीतील पीक कर्ज घेणाऱ्या सभासदांना आर्थिक भुदंड बसला आहे.

कळमसरे जळगाव जिल्हा बँकेच्या शाखेत कळमसरे, वासरे, खर्दे, पाडळसरे, नीम, शहापूर, तांदळी या सात गावातील शेतकऱ्यांकडून मागील दोन वर्षाचे व्याज रक्कम 1108790 (अकरा लाख आठ हजार सातसे नव्वद वसूल केली जात आहे तर तालुक्यातील आकडा व जिल्ह्यातील आकडा व्याज दराचा कोटीत जाईल. जिल्हा बँकेच्या चुकीच्या धोरणाने व आडमुठे पणामुळे शेतकऱ्यांना आर्थिल झळ बसत असून यावर उपाय योजना करीत व्याज वसुलीला स्थगिती देत नवीन पीक कर्ज वाटप करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

