पाडसे शिवार ते भिलाली फाट्यापर्यंत लावले होते फलक…
अमळनेर:- तालुक्यातील पाडसे शिवार ते भिलाली फाट्यापर्यंतच्या रस्त्यावरील तब्बल ६१ दिशादर्शक फलक चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
फिर्यादी महेश शिसोदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राज्य मार्ग क्र. ६ पाडसे शिवार ते भिलाली फाटा या रस्त्यावर बसविलेले २ लाख रुपये किमतीचे ६१ मार्गदर्शक फलक लावण्यात आले होते. त्यात ३२ दिशादर्शक, १२ अरुंद पुल, ९ वेगमर्यादा, २ मार्गदर्शक, ६ गोलाकार वळणाचे फलक यांचा समावेश होता. हे ६१ फलक लोखंडी अँगल सह १९ ते २२ एप्रिल दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. कंत्राटदार कंपनी व सा.बा. विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर मारवड पोलीसात फिर्याद देण्यात आली असून भादवि कलम ३७९ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास स. फौ. किशोर पाटील करीत आहेत. दरम्यान कंत्राटदार कंपनीकडून सदर फलक लावताना खोलवर न गाडल्याने व नीट काँक्रिट न ओतल्यामुळे चोरट्यांना ते सहज चोरून नेता आल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे असल्याचे समजते.