
अमळनेर – खानदेशात प्रसिद्ध असलेला संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवास अक्षय तृतीयेपासून सुरुवात होते. हा यात्रोत्सव सुमारे महिनाभर चालतो. मात्र यंदा मे महिन्याच्या पंधरवड्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने यात्रोत्सवात दुकानदार व पाळणा धारकांची तारांबळ उडाली व त्यासोबतच लाखो रुपयाचे नुकसान झाले.

काल झालेल्या पावसाने नदीपात्रात पाणीच पाणी शिरल्याने मुख्य प्रवाहात असलेल्या पाळणे धारक व विविध वस्तू विक्रेत्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसह जेसीबी द्वारे पाण्याचा निचरा होण्यासाठी दिवसभर प्रयत्न करण्यात आले.त्यामुळे व्यवसायिकांना थोडी का असेना मदत झाली. बोरी नदी पात्रात पाणी साचल्याने यात्रोत्सवात जाणाऱ्या भाविकांचा हिरमोड झाला आहे.

शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने शहरात जाेरदार हजेरी लावली. यामुळे बाेरी नदीपात्रात पुरपरिस्थिती निर्माण झाली हाेती. या पुरामुळे संत सखाराम महाराज यात्रोत्सवातील दुकानदारांचे माेठे नुकसान झाले. अजूनही यात्राेत्सवाची ५० टक्के दुकाने पाण्यात असून सायंकाळ पर्यंत पालिका प्रशासनाकडून जेसीबीव्दारे पाणी काढण्याचे काम सुरू हाेते. पालिकेेने नियाेजन न केल्याने पुरस्थिती निर्माण हाेऊन नुकसान झाल्याची माहिती यात्राेत्सवातील नुकसानग्रस्त दुकानदारांनी दिली. सायंकाळी मुख्याधिकारी व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता दुकानदारांनी संताप व्यक्त केला.
अमळनेर शहरात बाेरी नदीपात्रात संत सखाराम महाराज यात्रोत्सव सुरू आहे. बहूतांश दुकानदारांनी बाेरी नदीपात्रात दुकाने थाटली आहे. गेल्या दाेन दिवसांपासून यात्राेत्सवास उधान आले हाेते. शाळांना सुट्या लागल्याने भाविकांसह परिसरातील नागरिकांचा माेठा प्रतिसाद यात्राेत्सवास मिळत हाेता. गर्दी वाढली असताना शुक्रवारी सायंकाळी अमळेनर परिसरात जाेरदार अवकाळी पावसाने तडाखा दिला. सायंकाळी झालेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले हाेते. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आल्याचे दिसून आले.अवकाळी पावसामुळे शहर तुबंल्याचे दिसून आले. हे सर्व पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे हाल झाले. यात्राेत्सवात मुख्याधिकारी तुषार नेरकर, नगर अभियंता दिगंबर वाघ, आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी पाहणी करून पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

