
मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा एकंदरीत मतदानात १.०६ टक्क्यांची घट
अमळनेर : नगरपरिषद निवडणुकीत शहरातील अनेक मतदान केंद्रांवर समाधानकारक प्रतिसाद मिळाला असला तरी प्रभाग क्रमांक ९ मधील केंद्र क्रमांक ४८ वर अत्यंत अल्प मतदानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या केंद्रावर एकूण ८८८ मतदारांपैकी फक्त ३८३ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला, म्हणजेच केवळ ४३ टक्के मतदानाची नोंद झाली.
सदर केंद्रात पुरुष मतदार ४७४ व महिला मतदार ४१४ असून दोन्हींकडूनच कमी प्रतिसाद दिसल्याने राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे.
मतदारांच्या सहभागात झालेली मोठी घट ही लोकशाही प्रक्रियेसाठी धोक्याची घंटा असल्याचे जाणकार सांगत आहेत.
शहरातील आणखी दोन ते तीन मतदान केंद्रांवर ४६ टक्क्यांच्या आसपासच मतदान झाल्याने मतदार उदासीनतेचे सावट स्पष्टपणे जाणवले.
प्रचाराच्या गडबडीत जनजागृती झाली असली तरी मतदानाबाबतची सजगता आणि जागृती मात्र अपेक्षेप्रमाणे दिसली नाही, अशी तक्रार स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.
मतदानाचा बहुमूल्य हक्क — पण प्रतिसाद निराशाजनक योग्य उमेदवार निवडण्याचा अमूल्य अधिकार मिळालेला असताना मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवणे ही चिंताजनक बाब असल्याचे जाणकरांचे मत आहे. निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग कमी होत असल्याचे चित्र यंदा प्रकर्षाने दिसून आले.
२०१६ ते २०२५ — मतदानात किंचित घट
वर्ष मतदान टक्केवारी
२०१६ ६५.५४ %
२०२५ ६४.४८ %
मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा १.०६ टक्क्यांची घट नोंदली गेली. विशेषतः काही प्रभागांत अत्यल्प मतदान झाल्याने मतदार शिक्षण व जनजागृतीला अधिक प्राधान्य देण्याची गरज जाणवू लागली आहे.




