
अमळनेर-महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान, गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंतर्गत अमळनेर मंडळ भागातील अमळनेर, मंगरुळ, अंतुर्ली, धार, रंजाणे व मालपूर या गावातील नागरिकांसाठी काल दि. 23 रोजी इंदिरा भवन येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.शेकडो नागरिकांना शिबिरात लाभ मिळाला.

या शिबीराचे उदघाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांचे हस्ते करण्यात आले.त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सदर शिबीरास खासदार स्मिताताई वाघ यांनीही भेट देवून सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला.सदर शिबीरात उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसिलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी अमळनेर तुषार नेरकर तसेच तालुका स्तरावरील सर्व कार्यालये यांचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक विभागाने स्वतः उपस्थित राहून आपआपल्या विभागाचे स्टॉल लावून मंडळ भागातील सर्व गावातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, विदयार्थी व महिला यांचे शासकीय विभागांशी संबंधित तक्रारींचे / समस्यांचे निराकरण करुन वंचित लाभार्थीना आमदार अनिल भाईदास पाटील यांचे हस्ते प्रमाणपत्र/धनादेशाचे वाटप करण्यात आले.शिबिरात मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

खालील कार्यालयांकडून लाभार्थ्यांना मिळालेत लाभ
पुरवठा शाखेतर्फे 127 शिधापत्रिका, दुबार शिधापत्रिका,संगायो शाखे तर्फे 9 राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य धनादेश वाटप होऊन,347 डीबीटी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली तसेच 97 नवीन लाभार्थी यांचे अर्ज भरुन घेण्यात आले.निवडणुक शाखेतर्फे 17 नवीन मतदारांकडून नमुना 6 भरुन घेण्यात आले व 9 स्थलांतरीत मतदारांकडून नमुना 8 भरुन घेण्यात आला.सेतू शाखेतर्फे 245 उत्पन्नाचे दाखले वितरण,167 राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र वितरण,143 रहिवासी प्रमाणपत्र वितरण,78 जातीचे दाखले वितरण,103 आधार नोंदणी,237 आधार दुरुस्ती करण्यात आली.अमळनेर नगरपरिषदेतर्फे 18 प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला. 3 बचत गटांना दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत अनुक्रमे 9 लाख, 5 लाख व 5 लाखाचे धनादेशाचे वाटप करण्यात आले. महावितरण तर्फे 3 नवीन विज कनेक्शन आदेश देण्यात आले. 4 सोलर रिलीज आदेश देण्यात आले.पंचायत समितीतर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेतून
10 सिंचन विहीर प्रशासकीय मान्यता देण्यात आली.तसेच
10 गोठा शेड प्रशासकीय मान्यता,30 जलतारा प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या. एकात्मिक बालविकास विभागतर्फे
4 माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या मुलींना र.रु. 65,000/-चे धनादेश वाटप करण्यात आले.
सदर शिबीरात अंदाजे 1000 ते 1200 लोकांनी उपस्थिती नोंदवून समाधान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तहसिलदार रुपेशकुमार सुराणा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

