
अमळनेर:- तालुक्यातील नदी, नाले आणि ओढ्यांतून वाळू माफियाकडून रात्रंदिवस अवैध वाळू वाहतूक सुरू असून ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे. याबाबत तहसीलदार, तलाठी व सर्कल यांना वेळोवेळी तोंडी व लेखी निवेदन देवूनही अवैध वाळू तस्करी थांबत नसून प्रशासनाने झोपेचे सोंग कश्यामुळे घेतले आहे असा सवाल विचारला जात आहे.

तालुक्यातील जीवनदायिनी ठरणाऱ्या बोरी, पांझरा, तापी, अनेर, चिखली तसेच ओढ्यातून राजरोसपणे हजारो ब्रास चोरटी वाळू वाहतूक सुरू आहे. महसूल प्रशासन व पोलिस या अवैध चोरट्या वाहतुकीस प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येते. दररोज शेकडो ब्रास वाळू राजरोसपणे ओढली जात असल्याबद्दल या भागातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा लेखी निवेदने तहसीलदार, तलाठी व पोलिस अधिकारी यांना दिली आहेत. तरीही अवैध वाळू तस्करावर कोणतीही कारवाई केली जात नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

जळोद येथून रोज रात्री डंपरने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे या वाळू चोरी बाबत संबंधित तलाठी ,सर्कल , तहसीलदार व प्रांताधिकारी यांना वेळोवेळी निवेदने देवूनही याची दखल घेतली जात नाही त्यामुळे महसूल प्रशासन, पोलिस खाते व वाळू तस्कर यांचे लागेबांधे असल्याचे बोलले जात आहे. पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाकडून वाळु तस्करांवर कारवाई होणे अपेक्षित आहे पण ती होताना दिसून येत नाही. शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी वाळू तस्कराना विरोध केला असता वाळू माफियाकडून संबंधितांना दमदाटी करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. तस्कर ट्रॅक्टर, पिकअप, टिपर यासारखी वाहने सुसाट पणे हाकतात त्यामुळे अनेक वेळा अपघातही झाले असल्याची नोंद आहे. दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकयांच्या विहिरीसुध्दा बेसुमार वाळु उपसामुळे कोरडया पडल्या होत्या. सुदैवाने गेल्या दोन वर्षात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने पाणी टिकून असेल तरी वेळप्रसंगी वाळू तस्कराकडून तस्करी करण्यासाठी टोकाचे प्रयत्न होतात. अवैध वाळू वाहतुकीस विरोध करीत असताना वाळू तस्कर मात्र संबंधितांना बघून घेण्याच्या धमक्या देत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी महसूल व पोलीस प्रशासनास निवेदन दिले असून वाळू तस्करावर ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेत त्यांना पुढाकार घेण्याबाबत सांगितले होते. मात्र वाळू तस्करांपुढे कोणाचीच डाळ शिजत नाही. ते तेवढे मुजोर आणि बलशाली झाले आहेत. तालुक्यातील अशा सर्वच ठिकाणांवरील तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याची मागणी मांडळ व परिसरातून जोर धरून आहे. स्थानिक प्रशासन वाळू चोरी रोखण्याबाबत सक्षम नसल्याने जिल्हाधिकारी यांनी तरी अमळनेर तालुक्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

