
२३ वर्षीय तरुणाविरुद्ध पॉक्सोसह एट्रोसिटीच्या कलमान्वये गुन्ह्याची नोंद
अमळनेर : तालुक्यातील पिंगळवाडे येथील रहिवासी तसेच आश्रम शाळेतील सातव्या वर्गातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तेवीस वर्षीय तरुणाला सदर मुलीसह सुरत जवळील कामरेज येथून ताब्यात घेण्यात आले असून सदर तरुणावर पॉक्सो व एट्रोसिटी कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पिंगळवाडे येथील १४ वर्षे पाच महिने वयाची मुलगी आश्रम शाळेत सातव्या वर्गात शिकत होती. ३ जून रोजी मुलगी दिसून आली नाही म्हणून आईवडिलांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र मुलीचा तपास न लागल्याने तिला फुस लावून पळवून नेण्यात आल्याची खात्री झाल्याने मुलीच्या वडिलांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मारवड पोलिसांचे पथक सदर मुलीच्या शोधासाठी कार्यरत झाले. जानवे येथील पंकज रतीलाल पाटील (वय २३) याच्यावर मुलीच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्याने हेकॉ सुनील पाटील, पोकॉ उज्वल पाटील यांनी फोनच्या लोकेशनवरून ठावठिकाणा लावत अल्पवयीन मुलीसह पंकज याला कामरेज जि. सुरत गुजरात येथून ताब्यात घेण्यात आले. सदर मुलीला जळगाव येथील सुधारगृहात नेण्यात आले असून पंकज याला अमळनेर येथे पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पंकज याच्यावर एट्रोसिटी, पॉक्सोसह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुनील पाटील हे करीत आहेत.


