
अमळनेर:- तालुक्यातील नगाव बु.येथे ८ जून रोजी कृषी विभागामार्फत उपविभागीय कृषी अधिकारी सी.डी.साठे आणि तालुका कृषी अधिकारी ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सरपंच सरिता पद्माकर गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित केलेली होती.

सभेमध्ये प्रकल्पांतर्गत गावस्तरीय हवामान अनुकूल आराखडा, सूक्ष्म नियोजन तसेच प्रकल्पातील बाबी याविषयी उप कृषी अधिकारी प्रविण पाटील यांनी माहिती दिली. तसेच खरीप हंगामासाठी बियाणे उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यानंतर पीएमएफएमई, महाडीबीटी प्रणाली वरील योजना, मगांराग्रारोहयो फळबाग लागवड योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजना, बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी आणि बागायती कापसाचे खत व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन प्रविण पाटील यांनी उपस्थितांना केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आयोजन सहाय्यक कृषी अधिकारी नवल वाघ यांनी केले. यावेळी गावाचे पोलीस पाटील, गौरव गोसावी यांच्यासह शेतकरी प्रकाश पंढरीनाथ पाटील, रावसाहेब भाऊराव पाटील, मनोहर सुरेश पाटील, दिनेश गुलाबराव पाटील, सचिन बागले, अनिता दत्तात्रय पाटील, सुषमा मुकेश पाटील, कृषीताई नयना गोसावी यांच्यासह असंख्य महिला शेतकरी उपस्थित होते.

