
अमळनेर:- वाळूचे ट्रॅक्टर सोडण्याच्या विषयावरून दोन ग्राम महसूल अधिकाऱ्यात मोठा वाद होऊन हातापाई झाल्याची माहिती असून अतिलोभामुळे वाळू खाऊन भ्रष्ट झालेल्या झारीतल्या शुक्राचार्यांची इज्जत वेशीला टांगली गेली आहे.

प्रशासनाने खुली सूट दिल्याने निर्माण झालेला वाळूच्या भस्मासुराने आपले प्रताप दाखवायला सुरू केली आहे. बोरी नदीत पकडलेला ट्रॅक्टर वाला माझ्या सिस्टम मधला माणूस असून त्याला सोडा अशी विनंती कलेक्शन करणाऱ्या महसूल अधिकाऱ्याने पथकातल्या एकाला केली. मात्र काल माझ्या माणसाचे ट्रॅक्टर सोडले नाही म्हणून मी आज हे ट्रॅक्टर सोडणार नसल्याची भूमिका त्याने घेतली. त्यामुळे बाचाबाची होऊन दोघांनी नदीपात्रातच एकमेकांची गचांडी पकडल्याची माहिती आहे. अशा या प्रकारामुळे महसूलची आधीच गेलेली इज्जत वेशीला टांगली गेली असली तरी असे अनेक प्रकार होऊन ही कोणालाही शरम वाटत नसल्याने बिनबोभाट खिसेभरु धंदे सुरू आहेत.
सध्याच्या अधिकाऱ्यांनी निर्माण केलेली अंधाधुंद सिस्टम ते बदलून गेल्यावरही सुरूच राहणार असून नवीन येणाऱ्या चांगल्या अधिकाऱ्याला ते आवरणे कठीण जाणार आहे. आणि प्रशासनाने निर्माण केलेला अवैध वाळूचा भस्मासुर एक दिवस त्यांनाच गिळंकृत करणार हे निश्चित आहे.

