
अमळनेर :- तालुक्यातील गोवर्धन -खेडी ता. अमळनेर येथील रस्त्यावर अवजड वाहनाच्या वापराने तीन तेरा झाले आहेत. पाडळसरे धरणावर मुरूमाची आवश्यकता असल्याने खेडी येथून मुरूम वाहतूक सुरु आहे. क्षमतेपेक्षा जास्त मुरूम डंपर मध्ये वाहतूक केली जात असल्याने आत्ताच काही दिवसांपूर्वी बनविलेला रस्ता खचल्याने वाहनधारकांना वाहन चालविणे अवघड झाले आहे.

खेडी, गोवर्धन, कळमसरे मार्गे पाडळसरे धरणारवर मुरूमाची वाहतूक सुरु आहे. सकाळी सहा वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत लागोपाठ डंपरने मुरूम वाहतूक सुरु आहे. यात पाडळसरे धरणासाठी लागणारा मुरुमाला ग्रामस्थांचा विरोध नसून क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोडने डंपरमधून मुरूमाची वाहतूक सुरु आहे.गोवर्धन ते खेडी हा रस्ता नुकताच नव्याने करण्यात आला. परंतु या रस्त्यावरून ओव्हरलोड मोठ-मोठ्या डंपरने वाहतूक केल्याने दीड महिन्यात रस्त्याचे तीन तेरा वाजविले आहेत.
गोवर्धन -खेडी रस्ता जिल्हा परिषदे अंतर्गत अंदाजे 90 लाख रुपयांचा निधीत या रस्त्याचे काम करण्यात आले असून रस्त्यावरील नियमानुसार अवजड वाहनानी वाहतूक करणे गरजेचे असताना क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड मध्ये मुरूमची वाहतूक करण्यात येत आहे. संबंधीत जबाबदार अधिकाऱ्यांनी काना डोळा न करता कारवाई करावी असेही वाहनधारक व ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
परिसरातील रस्त्यांचे अवजड वाहनांनी लावली वाट
खेडी येथील शेत शिवारातून डंपरने वाहतूक केली जात असताना खेडी-कळमसरे , खेडी- वासरे- कळमसरे, खेडी-गोवर्धन-कळमसरे या रस्त्यावर अवजड वाहनांनी मुरूमची वाहतूक करण्यात आली. यामुळे परिसरातील रस्त्यांचा भराव खचल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. कळमसरे गावाजवळील पाडळसरे फाट्यावर या अवजड मुरूमची वाहतुकीमुळे मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबधित ठेकेदाराने क्षमतेपेक्षा जास्त सुरु असलेली वाहतूक थांबवावी असेही म्हटले जात आहे. तर दीड ते दोन महिन्यापासून सुरु असलेली अवजड वाहतुकीवर दुर्लक्ष का केले जातेय असेही विचारण्यात येत आहे.

