
कृत्रिम टंचाईमुळे मोजावे लागत आहेत अधिकचे पैसे, तालुका कृषी कार्यालयाचे दुर्लक्ष…
अमळनेर: तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली असून युरियाच्या एका बॅगची किंमत सर्व करासहीत २६६.५० रूपये आहे. परंतु तालुक्यात शेतकऱ्यांकडून ३०० ते ३५० रूपये वसूल केले जातात. तेही उपकार केल्यासारखा युरिया देत असून खताच्या किंमतीबाबत शेतकऱ्याने वाद घातला, तर विक्रेते युरिया उपलब्ध नाही, असे सांगून शेतकऱ्यांना आल्यापावली परत पाठवले जात आहे.

शहरातील काही मोठ्या कृषी केंद्रांचा मनमानी कारभार सुरू असून युरिया विकत घेताना कृषी केंद्रचालक शेतकऱ्यांना इतर खते किंवा किटकनाशक विकत घेण्याची सक्ती करत आहेत. इतर खते अथवा किटकनाशक खरेदी केले, तरच युरिया देतात. शेतकऱ्यांना केवळ युरियाची गरज असते. मात्र नाईलाजाने शेतकऱ्यांना युरियासोबत इतर उत्पादन विकत घ्यावे लागत असून आधीच कफल्लक असलेल्या बळीराजाला हंगामाच्या तोंडावर लुटले जात आहे. दुकानावर गेल्यानंतर शेतकऱ्याकडून रोख पैसे घेऊन कच्ची पावती देण्यात येते, ती पावती घेऊन शेतकरी गोडाऊन वर गेल्यावर त्याला खत भरून दिले जात आहे. या कृषी केंद्रचालकांच्या या लिंकींगवर कुणाचाही अंकुश नाही. संबंधित शेतकऱ्याने लेखी तक्रार केल्यास कारवाई करू असे उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे सांगत असले तरी तालुका कृषी अधिकारी आम्ही कारवाई करू शकत नाही असे उत्तर देत आहेत. सध्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी सुरू असून ठिबकच्या साह्याने कापूस व मक्का लागवड केलेल्या शेतकऱ्यांची खते, लिक्विड खते कीटकनाशके फवारणी खरेदीसाठी मोठी लगबग सुरू झाली आहे. विविध दुकानांवर कृषी निविष्ठा उपलब्ध झाल्या असून शासनाने ठरवून दिलेल्या दरात खतांची व कीटकनाशकाची खरेदी करावी असे बंधन असताना ही धरती कसणाऱ्या शेतकऱ्याकडून अधिकचे धन घेऊन त्यांना लुबाडले जात आहे. २२५९ मेट्रिक टन युरियाचा साठा आलेला असताना हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक व लूट होत आहे. कृषी विभाग या प्रकाराकडे काना डोळा करत असून तालुका कृषी अधिकारी आमच्याकडे कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे सांगत आहेत. शासनाने तालुका कृषी कार्यालयातील कार्यालयीन कृषी अधिकारी किंवा वरिष्ठ कृषी मंडळ अधिकारी यांना निरीक्षक म्हणून कारवाईचे आदेश दिले असल्याची माहिती जिल्हा स्तरावरून मिळाली आहे. शेतकऱ्यांनी या मनमानी कारभार करून अधिकचे पैसे घेणाऱ्या कृषी केंद्रा चालकांविरुद्ध लेखी तक्रार दिल्यास जिल्हा स्तरावरून कारवाई करण्यात येईल असे कृषी विकास अधिकारी मस्के व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तडवी यांनी सांगितले आहे.
प्रतिक्रिया
तालुक्यात शेतकऱ्यांना वाली उरला नसून ऐन हंगामाच्या सुरुवातीला खतांची आवश्यकता असताना कृत्रिम टंचाई करून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून लोकप्रतिनिधींनी तरी लक्ष घालावे अशी आमची मागणी आहे. – युवराज पाटील, शेतकरी -पिंपळे खुर्द
प्रतिक्रिया…
युरियाच्या कृत्रिम टंचाई बाबत शेतकऱ्यांची ओरड आली आहे, आधीच खतांचा पुरवठा झाला आहे, टंचाई नाही मात्र आधी निरीक्षक तालुक्यातील खत विक्रेते आलेला स्टॉक व वितरण बाबत प्रत्यक्ष तपासणी करायचे मात्र आता आमचे अधिकार काढून नव्याने कृषी अधिकाऱ्याला मार्गदर्शक तत्वे व प्रशिक्षण नसल्याने तालुका कृषी कार्यालयाने आतापर्यंत कोणत्याही दुकानात तपासणी केली नाही. – चंद्रकांत ठाकरे, तालुका कृषी अधिकारी

