
तापी महामंडळ करत नसेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलासाठी मार्ग काढावा –मगन पाटील
अमळनेर: अमळनेर व शिरपूर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या व पंचक्रोशीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या निम मांजरोद दरम्यान तापी नदीवर पूल मंजूर करून निधीही मिळून काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी कपिलेश्वर मंदिराचे विश्वस्त मंडळ,निम पाडळसरे परिसरातील सेवानिवृत्त अभियंते व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे धुळे जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, खासदार स्मिता वाघ, मंत्री जयकुमार रावल यांना देण्यात आले.

तापी नदीवर निम मांजरोद दरम्यान तापी नदीवर पूल निर्माण झाल्यास दोन्ही शिरपूर व अंमळनेर ही दोन तालुके दोन्ही जिल्हे जोडले जाऊन, मध्यप्रदेश व गुजरात जाण्यासाठी सोयीस्कर होणार आहे परिणामी दळणवळण वाढेल म्हणून शिष्टमंडळाचे प्रमुख व कपिलेश्वर मंदिराचे सचिव मघण पाटील यांनी महत्त्व पटवून दिले
तापी नदीवर निम मांजरोद पुलास तापी खोरे महामंडळ अंतर्गत पाडळसरे धरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. मात्र कालांतराने तो तापी महामंडळाने वगळला म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सदरचा पुल झाल्यास अमळनेर व शिरपुर तालुक्याच्या विकासास अधिक चालना मिळून दोन्ही तालुक्यातील नागरिकांना दळणवळण करणे सोपे होणार आहे. या मार्गामुळे अमळनेर ते शिरपूर अंतर २० किमीने कमी होईल. तसेच चाळीसगाव ते इंदोरचे अंतर ४५ किमीने कमी होणार आहे. शिवाय हायवेवरील ट्रॅफिक विभागली जाणार आहे. पाटबंधारे विभागाच्या वेळघालू पणामुळे तापी विकास महामंडळा कडुन सदर पुलाचे काम काढुन सार्वजनिक बांधकाम विभागा कडे वर्ग करावे व सर्वेक्षण करून निधी उपलब्ध करून पुलाचे काम लवकरच सुरु करावे. शासनास निधी उपलब्ध करणे शक्य नसल्यास बिओटी तत्वावर का असेना पण पुलाचे काम लवकर सुरु करावे अशी आग्रही मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार, शिंदखेडा विभागाचे उप अभियंता संदीप पडागळे यांना ,
सादर करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी कपिलेश्वर मंदिराचे सचिव व नागरी हित दक्षता समितीचे कार्याध्यक्ष मगन वामन पाटील सेवानिवृत्त अभियंता विजय मंगले, दत्तात्रय चौधरी,
सामाजिक कार्यकर्ता तुकाराम धोंडु चौधरी ,छोटू चौधरी , डॉक्टर एल डी चौधरी यांच्यासह पाडळसरे परिसरातील तांदळी ,शहापूर ,मारवड ,बोहरे ,धार ,डांगरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
निम मांजरोद पुलासाठी लोकचळवळ उभी राहणार…
निम मांजरोद पुलामुळे तापी नदीमुळे विभागलेले दोन्ही तालुके जवळ येणार असून दळणवळण सोयीस्कर होणार आहे. वाहतूक वाढल्यामुळे रस्त्यावरील मारवड, कळमसरे, निम या गावातील व्यावसायिकांना लाभ होणार असून अनेकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. तसेच मुख्य रस्त्यावरील गावांना महत्त्व येणार आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी पुलासाठी परिसरातून लोकचळवळ उभी राहणार असून निम मांजरोद पुलाचा प्रश्न जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व धुळ्याचे पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून मार्गी लावण्यासाठी नागरी हित दक्षता समिती प्रयत्नशील राहील असे मघन पाटील यांनी सांगितले.

