
अमळनेर :शहरात शाळा महाविद्यालयाबाहेर टवाळखोरी करणाऱ्या तसेच मुलींची छेड काढणाऱ्या सात तरुणांना पोलिसांच्या दामिनी तथा महिलांची छेड विरोधीपथकाने चांगलीच धुलाई केली असून त्यांच्यावर ११२ व ११७ कलम प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर , पोलीस अधिकारी विनायक कोते पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाने धनदाई कॉलेज, प्रताप महाविद्यालय जवळ अमळनेर पोलीस स्टेशनचे दामिनी पथक तसेच महिला छेडछाड विरोधी पथक यांनी टवाळखोरी करणाऱ्या सात तरुणांना पकडून पोलीस स्टेशनला आणून त्यांची चांगलीच ‘धुलाई’ केली.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , अमोल पाटील ,प्रशांत पाटील ,गणेश पाटील , जितेंद्र निकुंभे , नितीन कापडणे यांनी दोन्ही महाविद्यालयाजवळ मस्ती ,टवाळखोरी करणारे पवन गणेश निकम रा.ओमकार नगर अमळनेर , हर्षल गणेश निकम राहणार ताडेपुरा ,प्रकाश नामदेव माळी रा. शिरूड , इसरार शेख नसरुद्दीन शेख रा गांधलीपुरा ,विकास संजय पवार राहणार तासखेडा, भावेश संजय धनगर रा तांबेपुरा , मनोज प्रकाश पाटील राहणार अमळनेर या
रोड रोमियो व टवाळखोर मुलांविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम कलम ११२,११७ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून सदर रोड रोमिओ तसेच टवाळखोर मुलांना ताकीद देऊन सोडण्यात आले आहे.
अमळनेर शहरातील नागरिकांनी स्त्रियांबाबत तसेच शाळा कॉलेजच्या मुलींबाबत काही अडचणी तक्रारी असल्यास पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा संपर्क करणाऱ्यांचे नावे गुपित ठेवण्यात येतील.- दत्तात्रय निकम, पोलीस निरीक्षक अमळनेर

