
अमळनेर:- इंडियन मेडिकल असोसिएशन होमिओपॅथी डॉक्टरांची गळचेपी करत असून त्याबाबत निषेध व्यक्त करत अमळनेर तालुका होमिओपॅथी संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत मागण्या मांडल्या आहेत.
राज्य सरकारने २०१४ पासून होमिओपॅथी डॉक्टरांना रुग्णसेवेसाठी एलोपॅथी औषधे वापरण्यास परवानगी दिली. त्यासाठी सिसीएमपी कोर्स करून स्वतंत्र नोंदणी करण्यास मान्यता दिली. मात्र महाराष्ट्र वैद्यक परिषद गेल्या दहा वर्षापासून नोंदणी देत नव्हते. आता राज्य सरकारने या मागणीची दखल घेत नोंदणी करण्याचे लेखी आदेश दिले असून १५ जुलै पासून नोंदणी सुरू करणार असल्याची माहिती असून होमिओपॅथी डॉक्टर व सरकारविरोधात आयएमए खोटा अपप्रचार करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. एमएमसीने १५ जुलै पासून नोंदणी सुरू न केल्यास आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांना निवेदन देतेवेळी अमळनेर तालुका होमिओपॅथी संघटनेचे डॉ. डी एम पाटील, डॉ. देवयानी बडगुजर, डॉ. मिलिंद पाटील, डॉ. परेश पाटील, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. योगेश नेतकर, यांच्यासह डॉक्टर बंधू भगिनी उपस्थित होते.

