
अमळनेर:- तालुक्यातील शिरुड येथील व्ही झेड पाटील हायस्कूल येथे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये शालेय सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा, शालेय समिती अध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्या सहकार्याने,शालेय समिती सदस्य डी. ए.धनगर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

मा. जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे सदरची कार्यशाळा घेण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये प्रत्येक शाळेमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने शालेय सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जाणीव, जागृती केली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सदर कार्यशाळेचे आयोजन केलेले होते. यावेळी शाळा प्रशासन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन, प्रथमोपचार व ईव्हॅक्युएशन याबाबत प्रशिक्षण, पथक प्रमुख सतीश कांबळे यांनी दिले. मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसिंह रावळ, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाने, पथक प्रमुख सतीश कांबळे, सहप्रथक प्रमुख रवींद्र पाटील ,आकाश चौधरी व आपदामित्र यांच्या पथकाने मनोरंजक पद्धतीने प्रात्यक्षिके करून दाखवले. यावेळी जि. प. शाळा शिरुडचे विद्यार्थी व शिक्षक सुद्धा उपस्थित होते.
उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आनंददायी पद्धतीने, कुतूहल पूर्वक सर्व प्रात्यक्षिके पाहून व स्वतः अनुभवून , त्याचा मनमुराद आनंद लुटला. प्रथमोपचार कसे करावे हे समजून घेतले व प्राथमिक काळजी काय घ्यावी हे जाणून घेतले प्रात्यक्षिक स्वतः करून बघितले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डी. ए. धनगर यांनी सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांनी आपण घेतलेल्या प्रशिक्षणातील प्रथमोपचार व आपत्ती आल्यावर घेण्यात येणारी दक्षता व त्यावरील उपाय आपल्या मित्रांना, पालकांना व समाजाला समजावून सांगून त्याबद्दल जाणीव जागृती करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आपण घेतलेल्या प्रशिक्षणाची जाणीव जागृती करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-योगिता देशमुख मॅडम तर आभार- पी.जी निकम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्ही डी सूर्यवंशी, मंगलसिंग जाधव, चंद्रकांत पाटील, अशोक पाटील, अरुण पाटील, राहुल लांडगे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.