चार जणांवर गुन्हा दाखल, एक आरोपी फरार…
अमळनेर:- तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील आकडा सट्टा लावणाऱ्यावर एलसीबी व मारवड पोलिसांनी कारवाई करत चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना. प्रवीण मांडोळे यांना पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मुडी प्र. डांगरी येथे सट्टा आकडा खेळला जात असून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पो.ना. मांडोळे यांनी मारवड पोलीस ठाण्यातील पो.हे. कॉ. बागवान, भरत ईशी यांना सोबत घेऊन मुडी येथे दि. २३ मे रोजी दुपारी तीन वाजता भेट दिली. त्यावेळी बस स्थानक जवळील ग्रामपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस आडोश्याला चार इसम वही घेवून बसलेले दिसल्याने छापा टाकला असता त्यातील साहेबराव आबा भील (साकोदेकर) हा पळून गेला. व लोटन भीमराव पवार, विलास शालिक पाटील, पिंटू माधव नंदाळे हे सट्टयाच्या साहित्यासह रंगेहाथ आढळून आले. सदर इसमांची अंगझडती घेतली असता १२९० रुपये रोख, मिलन टाइम सट्टा जुगाराचे आकडे लिहलेली वही, असा मुद्देमाल आढळून आला असून वरील फरार आरोपीसह चारही आरोपींविरुद्ध मुं. जु. का. १२ (अ) व भादवि कलम १०९ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.