दारूबंदीची आग्रही मागणी करत एपीआय खलानेंना दिले निवेदन..
अमळनेर:- तालुक्यातील कलाली गावातील तरुण व कर्ते पुरुष गावठी दारूच्या आहारी गेल्याने आक्रमक ग्रामस्थांनी मारवड पोलीस ठाण्यावर भरदुपारी मोर्चा काढला.
गावात दारूबंदी करावी अश्या मागणीचे निवेदन सरपंच मिनाबाई सूर्यवंशी व विजयाबाई कोळी यांच्या नेतृत्वात महिला व ग्रामस्थांनी मोर्चात सहभागी होत पोलीस ठाण्यात मोर्चाचा समारोप करत एपीआय जयेश खलाने यांना निवेदन सादर केले. गावात दारूबंदी व्हावी म्हणून गेल्या ११ महिन्यापासून लढा दिला जात असून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे दारूबंदीसाठी लेखी मागणी केली तरीही दारूबंदी होत नाही म्हणून गावकऱ्यांनी एकत्र येऊन १९ रोजी पोलीस ठाण्यावर मोर्चाचे अस्त्र उगारले होते. १९ मे रोजी सामाजिक कार्यकर्ती प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वात मारवड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार होता मात्र प्रतिभा शिंदेंचा दौरा अचानक बदलल्याने मोर्चात बदल करून १९ ऐवजी २३ रोजी काढण्यात आला. त्याचे नेतृत्व सरपंच मिनाबाई सूर्यवंशी व उपसरपंच विजयाबाई कोळीनी केले, व गावातील महिलांना होणारे कौटुंबिक त्रास, वाद , भांडणे यांचे कथन एपीआय जयेश खलाने यांच्यासमोर मांडून गावात दारूबंदी साठी निवेदन सादर केले. सदर निवेदनात कलाली गाव व परिसरात गावठी दारू विक्री सुरू असून अनेक जण व्यसनाधीन झाले आहेत. या दारूच्या व्यसनामुळे १५-१६ कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला असून अनेक तरुण ही दारूच्या आहारी गेली आहेत. गेल्या दहा महिन्यांपासून दारू बंदी व्हावी म्हणून प्रयत्न सुरू असून ही दारू विक्री करणारी मंडळी कायद्याला ही जुमानत नाहीत. खुले आम दारू विक्री, दारू वाहतूक, काळ्या गुळाची वाहतूक, सर्वांच्या नाकावर टिच्चून सुरू आहे. यात गेल्या १५ नोव्हेंबर रोजी सरपंच मिनाबाई सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू असतानाच दारूबंदी बाबत ग्रामस्थ व महिलांनी मागणी केली असता एका दारू विक्रेत्याने महिलांना धमकावून दारू विक्री सुरूच राहील, आम्ही हप्ते देतो,पोलीस आम्हाला पकडू शकत नाही. तुम्ही ठराव संमत केला तरी आम्ही दारू निर्मिती व विक्री करूच असे धमक्या देत धिंगाणा घातला , या बाबत २२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक , पालकमंत्री यांच्याकडे तक्रार करूनही कोणावर कारवाई झाली नाही. म्हणून महिला पदाधिकारी व ग्रामस्थांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी आक्रमक भूमिका घेत गावात दारूबंदी होण्यासाठी कठोर पावले उचलावीत या मागणीसाठी महिला, पुरुष आणि युवक यांनी गोवर्धन गाठले व गोवर्धन गावाजवळून जमून सरपंच, उपसरपंच यांच्या नेतृत्वात मारवड पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. या मोर्चात गावातील तिन्ही माजी सरपंच शशिकांत पाटील ,श्रीकृष्ण पाटील, दिपक पाटील व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मंगलसिंग सूर्यवंशी यांनी सहभागी होत , ऍड पद्माकर पाटील ,रत्नाबाई कोळी ,मिनाबाई कोळी ,विमलबाई शिरसाट, दुर्गाबाई भिल ,नानाभाऊ पाटील ,अरुण अप्पा ,योगराज कोळी , कैलास शिरसाठ आदी विविध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चात सहभागी होत दारूबंदी बाबत निवेदन सादर केले.