अमळनेर:- तालुक्यातील निम येथील शेतकऱ्याच्या शेतातील बाजरीची कुट्टी अज्ञात कारणाने जळाल्याने सुमारे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
निम येथील हेमंत कैलास चौधरी यांचे कपिलेश्वर रस्त्यालगत शेत असून शेतातील बाजरी व मक्किची पशुधनासाठी केलेली चाऱ्याची कुट्टी पडलेली होती. दि. २४ मे रोजी सकाळी ६ वाजता तिथून धूर निघत असल्याचे सकाळी शेतात जाणाऱ्या लादू चौधरी यांना दिसल्याने त्यांनी ग्रामस्थांना बोलविले व आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र यात संपूर्ण कुट्टी जळून खाक झाली असून शेतकऱ्यांसमोर पशुधनासाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.ना. मुकेश साळुंखे करीत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्याच शेतातील उभे बाजरीचे अपरिपक्व पीक कुणीतरी अज्ञात माथेफिरू इसमाने कापून फेकून दिले होते.