पिक कर्जदार शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले निवेदन…
अमळनेर:- प्रत्येक पिक कर्जदार शेतकऱ्याकडून २०० रुपये प्रोसेसिंग फी वसूल करण्याच्या जिल्हा बँकेचा निर्णय चुकीचा असून त्याबाबत प्रा. सुभाष पाटील व राकेश मुंदडा यांनी पिक कर्जदार शेतकऱ्यांच्या वतीने बँकेच्या व्यवस्थापकांना निवेदन दिले.
सदर निवेदनात नमूद केले आहे की, कर्जदार सभासद हे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या संस्थेचे सभासद आहेत त्यांचा बॅकेशी थेट संबध येत नाही. जिल्हा बँक हि प्रत्यक्ष शेतकऱ्यास कर्ज पुरवठा न करता विविध कार्यकारी सहकारी यांना कर्जपुरवठा करते आणि दरवर्षी त्याचे व्याज आकारणी करुन वसुल करुन घेते त्यामुळे बँकेचा शेतकऱ्याशी प्रत्यक्ष संबध येत नाही. काही थकबाकीदार सभासद कर्ज घेवुन दहा दहा वर्ष कर्ज भरत नाही त्या कर्जावर बँक दरवर्षी व्याज घेते परंतु संस्थेला लागु असलेल्या नियमात ते पाच वर्षांनी दामदुप्पट झाले की, त्या पुढे व्याज आकारणी बंद होते म्हणजेच ते सभासद बँकेचे नसुन संस्थेचे सभासद आहेत हे यावरुन स्पष्ट होते. महाराष्ट्रात कर्ज वाटप त्रिस्तरीय यंत्रणेमार्फत होते राज्य सहकारी बँक यांचेकडुन जिल्हा मध्यवर्ती बॅक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेकडुन विविध कार्यकारी सह संस्था यात शेतकरी सभासदांचा बँकेशी कोणत्याही प्रकारे थेट संबध येत नाही. तसेच सदर प्रोसेसिंग फी कोणत्या नियमानुसार शेतकरी सभासदांकडुन प्रत्यक्षपणे आकारण्यात येत आहे. या बाबींचा खुलासा करण्यात यावा आणि सदर प्रोसेसिंग फी शेतकरी सभासदांकडुन आकारणी करणे बंद करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.