
नदी नाले ओसंडून वाहू लागले, ५० वर्षीय शेतकरी गेला वाहून, वीज पडून चार गुरे ठार…
अमळनेर : तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी दोन मंडळात अतिवृष्टी आणि काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस झाल्याने पातोंडा नांद्री गावाचा संपर्क तुटला. तालुक्यात वीज पडून चार गुरे ठार झाली तर गडखाम्ब येथे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नदीवरील बंधारा फुटून शेतांमध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे. तर पातोंडा येथील ५० वर्षीय शेतकरी वरून गेल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील नगाव मंडळात १०५ मिमी , मारवड मंडळात ७४ मिमी , शिरूड मंडळात ६४ मिमी , अमळगाव मंडळात ६० मिमी , अमळनेर मंडळात ५८ मिमी , पातोंडा मंडळात ४७ मिमी , भरवस मंडळात २४ मिमी , वावडे मंडळात १० मिमी पाऊस झाला आहे. पातोंडा येथील शेतकरी सर्जेराव संतोष बिरारी (वय-५०) हे काल सकाळी शेतात जात असताना पाय घसरून पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे.
नांद्री आणि पातोंडा दरम्यान असलेल्या नाल्याला दुसऱ्या दिवशी देखील पूर आल्याने दोन्ही गावात पाणी शिरले असून सुमारे अडीच तास वाहतूक बंद होती. नांद्री गावात तर घरांमध्ये पाणी घुसून गावकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष प्रणव चौधरी यांनी नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे.

त्याचप्रमाणे नगाव मंडळात देखील अतिवृष्टी झाल्याने चिखली नदीला पूर आला आहे. नदीवरील बंधाऱ्याच्या पाट्या संबंधित विभागाने काढल्या नसल्याने पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने बंधारा फुटून सोपान पाटील , सुरेश पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. सुपीक माती वाहून गेली आहे. याबाबत ग्रामपंचायतीला अनेकवेळा सांगून देखील पाट्या काढल्या गेल्या नाहीत म्हणून नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुक्यातील ढेकू सिम येथे सुनीताबाई विकास पाटील यांच्या शेतात वीज पडून रमेश बाजऱ्या बारेला यांच्या मालकीची गाय आणि बैल पहाटे ३ वाजेच्या सुमारास ठार झाले आहेत. तर सारबेटा येथेही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून पिके आडवी झाली आहेत. रणाईचे बु गावात सुधाकर साहेबराव पाटील यांच्या खळ्यात विज पडल्याने त्यांची गाय मृत्यू मुखी पडली आहे. जानवे येथील गावातील संतोष पुंडलिक पाटील यांच्या खळ्यात विज पडल्याने त्यांचा बैल मृत्युमुखी पडला आहे.
प्रतिक्रिया
नदी नाल्यांना पाणी आल्याने सडावन येथे घरांना तडे पडल्याने कुर्हे, सारबेटे या गावात वस्तीत पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना संबंधित गावच्या मराठी शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. संबंधित तलाठ्यांना पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. –रुपेशकुमार सुराणा ,तहसीलदार अमळनेर

