
अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी १८ रोजी सभासदांना बोलावून निवडणूक लावण्याचा प्रयत्न चालवला आहे त्या पत्राला उत्तर देत अध्यक्षांनी काहीही घोषणा केल्यास ती त्यांची वैयक्तीक बाब असून संस्थेच्या कार्यकारी मंडळाची त्यास संमती नव्हती व नाही. तसेच अध्यक्षांनी घोषीत केलेला कोणताही निर्णय किंवा निवडणुक कार्यक्रम हा संस्था, कार्यकारी मंडळ तसेच सभासद यांचेवर बंधनकारक असणार नाही असा खुलासा लेखी पत्रांन्वये संस्थेचे कार्याध्यक्ष व चिटणीस यांनी दिला आहे.
त्यामुळे अध्यक्षांच्या पत्राला संचालक मंडळाने शून्य किंमत दिली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात एकत्र निवडून आलेले पदाधिकारी मुदत संपल्यावर अध्यक्ष आणि संचालक यांच्यात वाद होतात. आणि निवडणूक लांबते असे झाले आहे. त्यामुळे अजून अनेक तांत्रिक अडचणी असल्याने निवडणूक लागणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास कालावधी लागू शकतो म्हणून निवडणूक दिवाळीनंतर लागू शकते. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात खान्देश शिक्षण मंडळाने संस्थेचे सभासद तसेच हितचिंतक व जनतेस आवाहन करताना म्हटले आहे की संस्थेच्या कार्यकारी मंडळाची त्रैवार्षीक निवड घेण्यासंदर्भात अध्यक्ष जितेंद्र शांतीलाल झाबक यांनी १४ ऑगस्ट २०२५ रोजी चिटणीसांना पत्र वजा आदेश दिलेले आहेत.सदर पत्रास संस्थेचे सचिव यांनी रितसर व सविस्तर खुलासा करणारे पत्र १६ ऑगस्ट २०२५ रोजीच अध्यक्षांना देवुन सद्य स्थितीत तातडीने निवडणुक घेण्यातील अडचणी कळविल्या आहेत. याउपर दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजीच अध्यक्षांनी चिटणीसांना पुन्हा पत्र देवुन दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी संस्थेचे शेकडो सभासद संस्था कार्यालयात येणार असल्याबाबत काही सुचना केलेल्या आहेत.
एकंदरीत अध्यक्ष हे घटनाबाहय पध्दतीने संस्थेचे कार्यकारी मंडळाची निवडणुक घोषीत करण्याचे बेतात आहेत.आपल्या संस्था व्यवस्थापना साठी स्वतंत्र घटना व निवडणुकी करीता निवडणुक नियमावली आहे. या नुसारच निवडणुक प्रक्रिया राबविणे आवश्यक व अनिवार्य आहे.मात्र अध्यक्षांनी आततायीपणाने व घटना विरोधी कृत्य करून निवडणुक प्रकीया राबविणे अपेक्षित नाही.या उपरही परस्पर काही घोषणा केल्यास ती त्यांची वैयक्तीक बाब असेल संस्थेचे कार्यकारी मंडळाची त्यास संमती नव्हती व नाही. तसेच अध्यक्षांनी घोषीत केलेला कोणताही निर्णय किंवा निवडणुक कार्यक्रम हा संस्था संस्था कार्यकारी मंडळ तसेच सभासद यांचेवर बंधन कारक असणार नाही.सदर निवेदन संस्था सभासदांची दिशाभुल व फसवणुक होवु नये या सदहेतुने प्रसिध्द करण्यात येत आहे असे कार्याध्यक्ष व सचिव यांनी म्हटले आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मतदार याद्या अपडेट करण्यासाठी खाजगी संस्थेला कंत्राट देण्यात आले होते ते काम अपूर्ण आहे. त्याचप्रमाणे सभासद एक मत देऊ शकतो की आठ मते सक्तीची आहेत याचा निर्णय झालेला नसून हा वाद नाशिक येथे धर्मदाय आयुक्तांकडे सुरू आहे. आणि या याचिकेवर अध्यक्षांची सुद्धा सही आहे. याव्यतिरिक्त अनेक तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे सध्या तरी निवडणुका लागणे अशक्य आहे. सर्वसाधारण सभा घेण्याव्यतिरिक्त अध्यक्षांना काहीच अधिकार नसतील तर या शोभेच्या पदासाठी निवडणूक का घ्यावी अशीही शंका उपस्थित होते. दरवेळी मुदत संपली की अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळ तसेच काही सभासदांमध्ये वाद होतात. खा शि बचाव आंदोलने सुरू होतात. निवडणुका लांबतात , होतात पार पडतात आणि सारे काही शांत होते हा संशोधनाचा विषय आहे.

