
कमी ब्रासच्या परमिटवर जास्त वाळूची वाहतूक, खिसे गरम केल्याने कारवाई नसल्याची चर्चा...
अमळनेर:- तालुक्यात वाळू वाहतुकीवर निर्बंध आणण्यासाठी गाव पातळीवर पोलीस पाटील व कोतवाल यांची ड्युटी लावण्यात आली आहे. मात्र शहरी भागात अवैध वाळू वाहतुकीला लगाम लागलेला दिसून येत नसून कमी ब्रॉसच्या परमिटवर भरमसाट वाळू उपसून नेली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
अमळनेर तालुक्यात ग्रामीण भागात कोतवाल आणि पोलिस पाटील रांत्रदिवस उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या आदेशाने पहारा देत आहे. चोरटी वाळू वाहतुकीला आळा बसावा यासाठी दिल्ली पासून गल्ली पर्यंत बंदोबस्त लावण्यात आला असला तरी शहरी भागात बोरी नदीतून बिनधास्त वाळू वाहतूक सुरु आहे. सर्व सामान्य नागरीक हा ग्रामीण भागात स्वतःचे घर व्हावे यासाठी घरकुल योजनेत कसे बसे घर बांधण्यासाठी जीवाचा आटा-पिटा करीत प्रयत्न करीत असताना त्याला बांधकामासाठी वाळू मिळत नसल्याने हाल होत आहेत. तर शहरी भागात मात्र वाळूचे वाहने सुसाट पळताना नजरे समोरून जात आहेत. यांच्यावर कुणाची मेहरबानी असल्याने अवैध वाळू वाहतूक शहरी भागात सुसाट पळतेय हे शोध घेण्याची आवश्यकता असताना त्यांनाच पाठबळ मिळत असल्याने रात्रीस खेळ चाले ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
दोन ते अडीच ब्रासचे परमिट आणि सहा ते आठ ब्रास रेती वाहतूक…
तालुक्याच्या बाहेरून वाळू वाहतूक अमळनेर शहरात सर्रास सुरु असताना दोन ते अडीच ब्रास वाळूचे परमिट घेऊन त्याच वाहनात सहा ते आठ ब्रास अवैध वाळू वाहतूक केली जात आहे. तसेच जास्त अंतर असलेल्या गावाचे परमिट घेऊन जवळच्या शहरात तेवढ्याच वेळात जास्तीच्या ट्रिप टाकल्या जात आहेत. हा प्रकार कुणाच्या आशीर्वादाने सुरु आहे याचा शोध घेणे महत्वाचे असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी फितूर शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर व अवैध वाळू करण्यावर कारवाई करावी असेही जनमानसात बोलले जात आहे.
शहराच्या चारही कोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून पोलीस व महसूल विभागाने डंपरची चौकशी केली तर सत्यता बाहेर येईल यासाठी लोकप्रतिनिधीनी पण कडक पाऊले उचलली पाहीजेत.
वाळू माफियांवर कोणाचा आशिर्वाद…
ग्रामीण पातळीवर स्थानिक पथक नेमल्याने गावातील पोलीस पाटील, कोतवाल यांना अवैध वाळू वाहतुकीला लगाम लागावा यासाठी प्रयत्न असताना शहरी भागात मात्र मोठ-मोठ्या बिल्डरांना अभय देऊन वाळू पुरवण्यास मदत करणारे जबाबदार अधिकारी यांच्यासह दलाल व वाळू माफिया यांचा शोध घेऊन बंदोबस्त करावा नाही तर ग्रामीण जनतेच्या विद्रोहास सामोरे जावे लागेल हे मात्र नक्की. मुजोर अधिकारी यांच्या वशील्याने व ठराविक लोकांना हाताशी धरून गोरख धंदा सुरु आहे.
शासकीय वरदहस्तामुळे वाळू माफियांची मुजोरी वाढली…
ग्रामीण भागेत पोलीस पाटील व कोतवाल यांची अवैध वाळू वाहतूक होऊ नये यासाठी ड्युटी लावण्यात आली आहे. ता. 15 ऑगस्ट रोजी बाम्हणे ता. अमळनेर येथील पोलीस पाटील गणेश भामरे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने वाळूचे ट्रॅक्टर पकडले असता वाळू माफी्यांनी ग्रामस्थांवर हल्ला चढविला. मात्र मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील यांनी तात्काळ पोलीस कर्मचारी पाठवित सुरक्षा दिल्याने अनर्थ टळला. व वाळूचे ट्रॅक्टर पोलिस पाटील गणेश भामरे यांनी तहसीलदार यांच्याकडे जमा करण्यात आले.मात्र शहरी भागात महसूल खात्यातील जबाबदार अधिकारी यात प्रांतधिकारी, तहसीलदार, तलाठी यांच्यासह अमळनेर पोलीस प्रशासन यांची निष्क्रियता दिसून येत आहे. प्रशासकीय यंत्रणेत वरच्यांनी मलई खाऊन ढेकर दिल्याने खालच्या पातळीवरही असंतोष पसरला आहे.

