
शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी संधी उपलब्ध होणार…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी संधी उपलब्ध करून देण्यासाठी गोविंदराव साळुंखे व राजेंद्र साळुंखे या बंधूंच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा आता वायफाय सुविधेने सुसज्ज झाली असून शाळेत तंत्रज्ञानाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर ह्या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. मारवड येथील रहिवासी व रिटायर्ड फौजी गोविंद सुभाषराव साळुंखे आणि पुणे येथे कार्यरत असलेले आयटी इंजिनिअर राजेंद्र सुभाषराव साळुंखे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक मुली व मुलांची शाळेत बीएसएनएल वाय-फाय स्वखर्चाने करून दिली. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच आशाबाई पवार, उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य, मारवड विकास मंचचे अध्यक्ष राकेश गुरव,ग्रामपंचायत अधिकारी, दोन्ही शाळा व्यवस्थापन अध्यक्ष व सदस्य,अंगणवाडी सेविका, मदतनीस, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत कवायत आणि वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना समाधान सुभाष शिंदे यांच्यातर्फे लेखन पॅड,कंपास आणि वह्या वाटप करण्यात आले.
साळुंखे बंधूंच्या दातृत्वाचे कौतुक…
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट हा शिक्षणाचा अविभाज्य भाग ठरत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांची उपलब्धता कमी असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढण्यात अडथळा येत होता. मात्र, वायफायच्या सोयीमुळे या शाळेतील शिक्षकांना ऑनलाईन शैक्षणिक साधने सहज उपलब्ध होणार आहेत. व्हिडिओ लेक्चर्स, ई-बुक्स, शैक्षणिक अॅप्स तसेच ऑनलाईन परीक्षेची तयारी याचा थेट लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शाळेत वायफाय सुरू झाल्याने शिक्षक-विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिक्षकांना अध्यापन अधिक प्रभावी बनविण्यास मदत होणार आहे. ग्रामस्थ व पालकांनी साळुंखे बंधूंच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे. “आजच्या काळात खऱ्या अर्थाने ग्रामीण शाळा डिजिटल इंडिया मोहिमेशी जोडली गेली आहे. मुलांना याचा प्रचंड फायदा होईल,” अशा प्रतिक्रिया पालक व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहेत.

