अमळनेर:- तालुक्यातील गांधलीजवळ काल सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास चारचाकी वाहन अचानक पलटी झाल्याने पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नागिरी जिल्ह्यात केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असलेले व पिळोदे येथील मूळ रहिवासी भगवान हिरामण मोरे हे नातेवाईकांच्या लग्न समारंभानिमित्त गावात आले होते. सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास भगवान मोरे, त्यांची पत्नी विजया भगवान मोरे, पुतणी माया जितेंद्र भील, मुलगा कुणाल मोरे, पुतण्या सुपडू भील असे स्वतःच्या मालकीच्या एम एच १९ डीव्ही २३१२ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने धुळ्याला जात असताना गांधली गावाच्या पुढे अचानक रस्त्याच्या बाजूच्या चारीत पलटी झाली. त्यावेळी तेथून जात असलेले प्रत्यक्षदर्शी व प्रवाशांनी त्यांना दुसऱ्या वाहनात टाकून अमळनेर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असून इतरांना किरकोळ जखमा व एकास गंभीर मुका मार बसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.