
‘भारत जागृत मंच’कडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन
अमळनेर:- महाराष्ट्र राज्यात वाढत्या प्रेमविवाहाच्या घटनांमुळे सामाजिक असंतुलन आणि कुटुंबांतील मतभेद वाढत असल्याचे कारण देत, ‘भारत जागृत मंच’ने’ राज्य सरकारकडे प्रेमविवाहासाठी आई वडील व पालकांची संमती अनिवार्य करणारा कायदा अतीतातडीने लागू करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात मंचने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अल्पवयीन आणि प्रौढ युवक-युवतींमध्ये प्रेमसंबंधांमुळे देशभरात अनेक गंभीर गुन्हे, प्रेम प्रकरणातून फसवणुकीच्या घटना आणि खूनाचे प्रकार वाढीस लागले आहेत.अशा प्रेम विवाहांमुळे अनेक वेळा समाजातील असंख्य कुटुंबीयांवर मानसिक ताण येऊन आत्महत्येसारख्या घटना घडत असल्याचे मंचं’चे मत आहे.
प्रेमविवाहाची नोंदणी करताना नोंदणी अधिकारी, नगरपालिका अथवा महानगरपालिका यांनी दोन्ही पक्षांच्या पालकांचे लेखी संमतीपत्र घेणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक करावे. आई वडील व पालकांच्या संमतीशिवाय पळून जाऊन विवाह करणाऱ्या युवक-युवतींना त्यांच्या पालकांनी संपत्ती आणि कुटुंब नोंदीतून बेदखल करण्याचा अधिकार कायद्यात द्यावा. राज्यातील सार्वजनिक ट्रस्ट, मंदिर संस्था आणि विवाह नोंदणी केंद्रांवर देखरेख ठेवून धर्मदाय आयुक्त कार्यालयामार्फत तपासणी करावी. संशयास्पद विवाह नोंदींवर तात्काळ कारवाई व्हावी, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. ९ रोजी, श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथील कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भारत जागृत मंचचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संतोष बाबुराव पाटील तसेच स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील दयाराम महाजन, नवप्रवर्तनवादी सामाजिक कार्यकर्ते. संदीप युवराज पाटील, यांसह मान्यवर उपस्थित होते.




