
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी आणि पत्रकारांची बैठक संपन्न…
अमळनेर : नगरपालिका निवडणूकीत १८ प्रभागात ३६ जागांसाठी तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष साठी ९७ मतदान केंद्रांवर ८९ हजार ७५१ मतदार मतदान करणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी आणि पत्रकारांची बैठक पालिका सभागृहात बोलावण्यात आली होती. अमळनेर शहरात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत एक मतदान केंद्र वाढले आहे. आचार संहिता कक्ष प्रमुख म्हणून गटविकास अधिकारी एन आर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यंदाच्या निवडणूकीत ४५ हजार ९२८ पुरुष ,४८ हजार ८२१ महिला व इतर २ असे मतदार मतदान करतील. दुबार मतदारंबाबत प्रशांत निकम यांनी विचारणा केली असता मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितले की पालिका कर्मचार्यांमार्फत तपासणी सुरू आहे. मतदारांकडून परिशिष्ट अ भरून घेतले जाणार आहे. दुबार मतदारांची मतदान यादीत नोंद केली जाणार आहे. ज्या दुबार मतदारांचा शोध लागणार नाही त्यांच्याकडून मतदानाच्या दिवशी परिशिष्ट भरून घेतले जाईल.
उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच विविध परवानग्या प्राप्त करण्यासाठी नगरपालिकेत एक खिडकी योजनेचे सात टेबल लावण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलवर तीन प्रभागाचे काम चालेल , नगराध्यक्ष पदाचे काम स्वतंत्र टेबलावर असेल.
मतमोजणी मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी तीन डिसेंबरला असल्याने उमेदवारांनी आपले प्रतिनिधी मतमोजणी प्रतिनिधी नेमण्यासाठी तीन दिवस आधीच अर्ज करावेत असे आवाहन तहसीलदार सुराणा यांनी केले.




