कृषी विभागाकडून तालुक्यातील कळंबु येथे ६२ हजाराचे बियाणे जप्त…
अमळनेर:- तालुक्यातील कळंबु येथे अवैधरित्या एचटीबीटी कापूस बियाणे विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने कृषी विभागाने छापा टाकत कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा कृषी कार्यालयात बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक अरुण श्रीराम तायडे यांना माहिती मिळाली की, अमळनेर तालुक्यात कळंबु येथे राजेंद्र धोंडुसिंग राजपुत नामक इसम हा स्वताच्या फायद्याकरिता शासनाकडून बंदी असलेले एचटीबीटी बियाणे विक्री करत आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार सदर प्रकाराची शहानिशा करण्यासाठी तंत्र अधिकारी संजय शेवाळे, कृषी सहायक गणेश पाटील, अमोल भदाणे, कृषी सहायक विद्या पाटील व डमी ग्राहक योगेश सूर्यवंशी यांना सोबत कळंबु येथे भेट दिली. डमी ग्राहकास राजेंद्र राजपुत यांच्याकडे बियाणे घेण्यासाठी पाठविले असता त्यांनी ते बियाणे खळ्यात असल्याचे सांगून ते खळ्याकडे जात असताना गावात अनोळखी गाडी आल्याचे व छापा पडेल याचा संशय आल्याने राजेंद्र राजपुत हा खळ्याच्या रस्त्याने पळून गेला. त्यामुळे सदर अधिकाऱ्यांनी खळ्यात शोध घेतला असता त्यांना पिकंकॉट हायब्रीड कंपनीची ५० पाकिटे आढळून आली. त्यांची किंमत एकूण ६२५००/- रू. असून त्यापैकी दोन पाकिटे ही नमुण्याकरिता घेत उर्वरित ४८ पाकिटे मारवड पोलीसात जमा करण्यात आली आहेत. विविध कलमान्वये आरोपीवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो भरत इशी हे करीत आहेत.