
अमळनेर : नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तीन व्यक्तींना उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी चोपडा तालुक्यातील तिघांना तीन महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

चोपडा तालुक्यातील बोरोले नगर मधील भैय्या उर्फ विजय लोटन पाटील , नागलवाडी येथील तुळशीदास रवींद्र पाटील , आणि हरेश्वर कॉलनीतील संग्राम शामसिंग परदेशी यांच्याविरुद्ध गुरे कोंबून बेकायदेशीर वाहतूक करणे ,गुरांना जिवंतपणी मरण यातना देणे , तसेच मिरवणुकीत गैरकृत्य करून जातीय भावना दुखावणे असे गुन्हे दाखल होते. निवडणूक काळात समाजासाठी असे कृत्य घातक ठरू शकते किंवा यांच्याकडून समाजाला त्रास होऊ शकतो म्हणून चोपडा पोलीस निरीक्षकांनी डीवायएसपी कडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला. चोपडा डीवायएसपी यांनी ते प्रस्ताव उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे याना दोन वर्षे हद्दपार करण्याच्या मागणी सह पाठवले. यावर उपविभागीय अधिकारी भंगाळे यांनी सुनावणी घेऊन तिघांना महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या ५६(१)( अ)( ब ) प्रमाणे तीन महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. आदेश मिळाल्यापासून त्यांनी जळगाव जिल्ह्यातून बाहेर निघायचे आहे व उपविभागीय दंडाधिकारी यांच्या परवानगीशिवाय जिल्ह्यात प्रवेश करू नये असे आदेशात म्हटले आहे.

