
अमळनेर : शेडनेट च्या नावाखाली अंगठे घेऊन सात लाख रुपये कर्ज काढून एका शेतकऱ्यांची ७ लाख रुपयात फसवणूक केल्याची घटना २०२० मध्ये घडली. पारोळा तालुक्यातील शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेरपाट येथील शेतकरी मधुकर गडबड पाटील यांची अमळनेर तालुक्यातील सडावण येथे शेती आहे. २०२० मध्ये त्यांनी पोखरा योजनेअंतर्गत अमळनेर तालुका कृषी विभागात अर्ज केला. त्याचवेळी एजंट समाधान पंडित शेलार त्याच्याकडे आला आणि त्याने तुमचे शेडनेट मंजूर करून देतो आणि कर्जही मंजूर करून देतो असे सांगून युनियन बँकेत नेले. तेथे काही कागदपत्रांवर अंगठे घेतले. त्यांनतर ओम ऍग्रो कंपनी सोनेवाडी ता शिंदखेडा येथील कामगारांनी शेड नेट साठी खांब गाडले. मात्र शेडनेट लावले नाही. नंतर युनियन बँकेची नोटीस आल्यानन्तर मधुकर पाटील यांना कळाले की त्यांच्या शेतजमिनिवर बोजा टाकला गेला असून सात लाख रुपये कर्ज आणि त्यावरील व्याज मिळून अकरा लाख रुपये झाला आहे. त्याच्या खात्यावरील कर्जाची रक्कम ओम ऍग्रो सर्व्हिसेस सोनेवाडी यांच्या खात्यावर १८ फेब्रुवारी २०२० मध्ये वळती झाली होती. ओम ऍग्रो चा मालक उद्धव कुवर आणि समाधान शेलार यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे समजले. दोघांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची फिर्याद अमळनेर पोलीस स्टेशनला पाच वर्षानंतर देण्यात आल्याने समाधान शेलार आणि उद्धव कुवर यांच्या विरुद्ध भादवि कलम ४२० ,४०९ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत करीत आहेत.

