
अमळनेर:- आगामी नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे आयोजित द्वितीय निवडणूक प्रशिक्षण वर्ग २८ नोव्हेंबर रोजी इंदिरा भवन येथे अत्यंत उत्साहात पार पडले.

प्रशिक्षणा दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी तथा मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने डी. ए. धनगर यांनी प्रशिक्षण दिले. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपल्याला दिलेली राष्ट्रीय जबाबदारी निष्पक्षपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोणत्याही तांत्रिक अडचणींवर मात कशी करावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अमळनेर तालुक्यात एकूण ६२१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यात १२ कर्मचारी गैरहजर होते.लोकशाहीचा हा उत्सव शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी ओळखून संयुक्तिक वर्तन करावे आणि जबाबदारी ओळखून वागावे अशी सक्त ताकीद देण्यात आली. तांत्रिक बाबींमध्ये होणाऱ्या चुका टाळण्यासाठी सदर प्रशिक्षण वर्ग आयोजित केलेला होता. यावेळी प्रदत्त मते व आक्षेपित मते टाळण्यासाठी खबरदारी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी सहज असले पाहिजे. मतदानाची टक्केवारी आणि विविध नमुने अचूक कसे भरावे याविषयी सांगण्यात आले.
प्रशिक्षणा दरम्यान तज्ञांनी ईव्हीएम मशीनच्या हाताळणी बाबत व कार्यपद्धतीबाबत कृतीयुक्त प्रशिक्षण देण्यात आले. मशीनची सिलिंग आणि जोडणीचे सविस्तर प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदार प्रक्रियेतील आचारसंहिता व मॉक पोल याबाबत खबरदारी घेण्याचे तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास दुप्पट झाला असून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आपल्या मदतीसाठी असेल असा आत्मविश्वास देण्यात आला.
निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची राष्ट्रीय जबाबदारी आहे ती पार पाडताना कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अशी सक्त ताकीद अधिकाऱ्यांनी दिली. 97 मतदान केंद्रांवर एकूण 89751 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात पुरुष मतदार 45928 तर महिला मतदार 43821 आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
दरम्यान, प्रशिक्षणासाठी १२ कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असून प्रक्रिया सुरू असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली.
याकामी निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके, सचिन गवांदे, विद्या पाटील, प्रियंका पाटील,मुकेश काटे यांनी सहकार्य केले.

