
अमळनेर : शहरातील पैलाड भागातील शिवाजी नगर येथील चेतन उर्फ़ सत्तूकिरण धोबी (वय २०) याला उपविभागीय दंडाधिकारी मयूर भंगाळे यांनी सहा महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहेत.
चेतन धोबी यांच्याविरुद्ध पैसे लुटणे ,मोबाईल हिसकावणे , शारीरिक दुखापत करून रक्कम लुटणे ,गावठी पिस्टल बाळगणे , मोटरसायकल चोरी आदी प्रकारचे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यापासून शहरातील नागरिकांच्या सुरक्षेस धोका असून गावातील शांतता व कायदा व सुव्यवस्थेस धोका निर्माण झाला आहे म्हणून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी चेतन धोबी याला जळगाव , धुळे ,नंदुरबार जिल्ह्यातून दोन वर्षे हद्दपार करण्यासाठी डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकारी मयूर भंगाळे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. मयूर भंगाळे यांनी नोटिसा देऊन सुनावणी घेतली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६(१)(अ)(ब) प्रमाणे चेतन यास सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपारचे आदेश दिले आहेत. आदेशाच्या तारखेपासून दोन दिवसात त्याने जळगाव जिल्ह्याच्या हद्दीबाहेर जायचे आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय त्याने हद्दीत प्रवेश करू नये. तसेच जिल्ह्याबाहेर राज्यात जिथे राहील तेथील नजीकच्या पोलीस स्टेशनला त्याने दर महिन्याला पत्ता द्यावा. आणि राज्याबाहेर जायचे असेल तर दहा दिवसाच्या आत पोलीस स्टेशनला पोस्टाने अथवा इतर मार्गाने कळवण्याचे आदेशात म्हटले आहे.




