
दोन दिवसीय स्मार्ट गर्ल कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी राजेंद्र भुतडा यांचे प्रतिपादन…
अमळनेर – बदलत्या जमान्यात आई वडिलांना आपल्या भूमिकेत बदल करावा लागेल असे आवाहन ज्येष्ठ प्रशिक्षक राजेंद्र भुतडा(नाशिक )यांनी केले.ते भारतीय जैन संघटनेच्या अमळनेर येथे तेरापंथ भवनात दोन दिवसीय आयोजित स्मार्ट गर्ल कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी माता पिता संवाद या शेवटच्या सत्रात बोलत होते. या कार्यशाळेत 13ते 19 वर्ष वय असलेल्या 35 मुलींनी सहभाग घेतला.
या कार्यशाळेस प्रमूख अतिथी म्हणुन संघटनेचे खानदेश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा, माजी विभाग अध्यक्ष प्रा.अरुण कोचर,विभाग उपाध्यक्ष व या प्रोजेक्ट चे खानदेश प्रमुख सुमित मुनोत, जिल्हा अध्यक्ष निर्मल बोरा, जिल्हा सचिव दर्शन देशलहरा, प्रकाश छाजेड,सचिन ओसवाल आदि उपस्थित होते.
प्रा.डागा म्हणाले,संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असुन आपल्या समाजाच्या मुलींना भविष्यात कोणताही त्रास होऊ नये,त्यांना स्व ची ओळख होऊन सुरक्षित जिवन जगता यावे या उद्देशाने तयार केला आहे.तसेच संघटनेचे इतर सुरू असलेल्या कार्यक्रमांची माहिती देऊन, विवाह जुळविण्यासाठी नविन पारिणय पथ व दिलं का जिकशा हे कार्यक्रम सुरू झाल्याचे सांगून लग्नाला 5ते 7वर्ष झालेल्यांसाठी दंपत्ती सक्षमीकरण कार्यशाळा घेण्याचे आवाहन केले.
प्रशिक्षक राजेंद्र भुतडा यांनी मुलींसाठी स्व ची ओळख, निवड व निर्णय, संवाद व नाते, मित्रता व प्रलोभन, मासिक धर्म:स्वच्छ्ता व पोषण, आत्म सन्मान व आत्म रक्षा हे 6सत्र घेऊन मार्गदर्शन केले. तसेच शेवटच्या 7व्या सत्रात माता पिता संवाद मध्ये मुलीचे मित्र बना, त्यांची तुलना इतरांशी करू नका, त्यांच्या आवडीनुसार करियर निवडू द्या, त्यांना समजून घ्या,सामजिक व सामान्य ज्ञान सोबत घेऊन शिकवा अश्या अनेक टिप्स दिल्या. प्रा.अरुण कोचर यांनी मनोगत व्यक्त केले.ईशा शाह,भव्य शाह, प्रचिती मुंदडा, गोल्डी कोचर, महिमा जैन, गुंजन लोढा, काव्या सिंघवी, उर्वी शाह, हिरल फिरोशिया, जिया शाह या सहभागी मुलींनी आपले कार्यशाळेबद्दलचे सकारात्मक अनुभव सांगीतले.सूत्र संचालन शहर सचिव प्रतीक लोढा तर आभार प्रदर्शन अध्यक्ष रोहित सिंघवी यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा सदस्य नूतन पारख तर शहर कोषाध्यक्ष प्रणिता लोढा यांनी परिश्रम घेतले.




